मुलीसोबत गैरकृत्य ; पत्नीवर झाडली गोळी

 

शहापूर येथे स्वतःच्या मुलीशी गैरकृत्य केल्याची वाच्यता करू नये यासाठी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करून तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडल्याप्रकरणी 'मोका'तील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.


त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद संशयिताच्या पत्नीने दिली आहे. संशयिताला अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली.


एप्रिल 2022 मध्ये संशयित 'मोका'च्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. ऑक्टोबर 2022 पासून संशयिताची मुलगी घरामध्ये एकटी असताना तिच्याशी गैरकृत्य करीत असताना तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तिने त्याला बाजूला ढकलला आणि ती घराच्या खाली पार्किंग विंगमध्ये पळून गेली. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी मुलीने ही घटना आईस सांगितली. तिने याबाबतचा जाब विचारून वागण्यात सुधारणा नाही केली तर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगण्यासह पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. यावर संशयिताने तक्रार करून तर बघ, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत घरातील बेडवर पाडून पत्नीचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना मुलांनी बाजूला ढकलून आईला सोडवले.


त्यानंतर 10 डिसेंबर रोजी संशयिताने पत्नीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली. पत्नी लगेच बाजूला पळाल्याने गोळी बेडरूमच्या दरवाजाजवळील भिंतीमध्ये घुसली. यावेळी मुलांनाही ठार मारण्याची धमकी दिली. 21 डिसेंबर रोजी पुन्हा नातेवाईकांमध्ये बदनामी करतेस, असे म्हणत त्याने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाने संशयिताला बाजूला केले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अपार्टमेंटमध्येही तो नेहमी दारू पिऊन यऊन बंदुकीची भीती दाखवून दहशत निर्माण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments