जादा परताव्याच्या आमिषाने कोट्यवधीची फसवणूक केलेल्या ए.एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्सच्या संबंधित कंपनीने करवीर तालुक्यातील 37 पेक्षा अधिकगुंतवणूकादारांची 50 लाख 49 हजार 736 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला.
कुडित्रे (ता. करवीर) येथील मिलिंद सुरेश गावडे यांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
ए. एस. ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीबाबत तक्रार देण्यासाठी गावडे व त्यांचे सहकारी आठवड्यापासून करवीर पोलिस ठाण्याचा उंबरठा झिजवत आहेत. सकाळ, सायंकाळ हेलपाटे मारूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून बलकवडे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला.
ए. एस. ट्रेडर्स कंपनीच्या प्रमुखासह संचालक मंडळ, एजंटांच्या साखळीने 2021 पासून गुंतवणूकदाराकडून पैसे भरून घेतले आहेत. प्रारंभीच्या काळात परतावे देण्यात आले. मात्र, चार महिन्यांपासून मुद्दलसह परतावे देण्यास टाळाटाळ केलीजात आहे. शिवाय मुख्यालयासह कार्यालयेही बंद करण्यात आल्याने कंपनीच्या संबंधितांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे
कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर लोहितसिंग सुभेदारसह 27 जणांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. सर्व संशयित अद्यापही फरार आहेत. त्यापैकी 13 संचालकांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार होती.मात्र, संशयिताचे वकिल अनुपस्थित राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली. येत्या 4 जानेवारीला सुनावणी होणार आहे.




0 Comments