पार्टी जीवावर बेतली, चार दिवसांत चौघांचा मृत्यू

 

पार्टी करून मोटरसायकल चालवणे चार तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना गोरेगाव आणि मालाड येथे घडली. अनुप यादव, विकास तोंडे, मनोजकुमार राजेंद्रन आणि इसाक अँथोनी अशी त्या चौघांची नावे आहेत.


प्रकरणी मालाड आणि गोरेगाव पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

पहिली घटना आज पहाटे मालाडच्या काचपाडा परिसरात घडली. कांदिवली पोयसरचे रहिवाशी असलेले मनोजकुमार आणि इसाक एका एमएनसीमध्ये काम करत होते. शनिवारी रात्री मनोजकुमार आणि इसाक हे त्याच्या एका मित्राकडे पार्टीसाठी गेले होते. रात्री पार्टी केल्यावर त्या दोघांना सिगरेटची तलफ लागली. त्यामुळे ते सिगरेट आणण्यासाठी मालाडच्या दिशेला गेले. मनोजकुमार हा बुलेट चालवत होता. 


तर इसाक हा मागे बसला होता. मनोजकुमार हा सुसाट वेगात बुलेट चालवत होता. त्याचे बुलेटवरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यात पार्क असलेल्या पाण्याच्या टँकरला त्याच्या मोटरसायकलची धडक बसली. त्या धडकेत ते दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच मालाड पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या दोघांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


तर दुसरी घटना गेल्या आठवडय़ात गोरेगावच्या एमटीएनल ब्रिजवर घडली. मूळचा तामिळनाडूचा रहिवाशी असलेला अनुप यादव मुंबईत आला होता. त्यामुळे अनुपच्या मित्रांनी पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीला विकास तोंडे आणि त्याचे मित्र गेले होते. रात्री त्या सर्वांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते सर्व फिरायला जात होते. अनुप हा मोटरसायकल चालवत होता. तर विकास हा मागे बसला होता. एमएटीएनल ब्रिजवर अनुपचे मोटरसायकलवरचे नियंत्रण सुटून अपघात झाला. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र विकासला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अनुपचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments