नागूपर : गळफास कसा घ्यायचा आणि कसा काढायचा हे युट्यूबवर बघता बघता नागपुरातील आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जीव गेला. अग्रण्य सचिन बारापात्रे असे या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेने नागपुरातील क्वार्टर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
क्वार्टर परिसरात राहणाऱ्या अग्रण्यचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी अग्रण्यने गच्चीवर जाऊन गळफास कसा घ्यायचा आणि काढायचा याचा व्हिडिओ पाहून तसा तो करू लागला आणि याच अवस्थेत तो शेजाऱ्यांना दिसला.
त्याला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी केलेल्या तपासात अग्रण्यला मोबाईलचे अक्षरश: वेड होते. त्याने युट्युबसह अन्य अॅप आपल्या आईच्या मोबाईलवर डाउनलोड केले होते. गळ्यात गळफास लटकवून तो कसा काढायचा याबाबतची माहिती तो सातत्याने बघत असल्याचे समोर आले आहे.
त्यातूनच त्याने तसा प्रयत्न केल्याने त्यातून त्याला गळफास लागला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असे तपासात पुढे आले आहे. दरम्यान, नागपुरातील सक्करदरा पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती सक्करदरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.
0 Comments