चारचाकी वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. वसीम मुजाहीद शेख (वय ३४, रा. बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन चौक, भिंगार) व अजय ऊर्फ सोनू रामचंद मुदलीयार (वय ३२, रा.
सिटीझन कॉलनी, विजय लाईन चौक, भिंगार) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर गुरूवारी (ता.२६) बाराबाभळी (ता.नगर) शिवारात ही कारवाई करण्यात आली.
बाराबाभळी परिसरात अहमदनगर-पाथर्डी महामार्गावर निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनामध्ये दोन व्यक्ती हे गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. संशयीत चारचाकी वाहन येताच पोलिसांनी अडवले. त्यातील वसीम मुजाहीद शेख व अजय उर्फ सोनू रामचंद मुदलीयार यांना ताब्यात घेतले.
वाहनाची (एमएच १२ जेसी ८४७१) झडती घेतली असता डिक्कीमध्ये एका प्लॅस्टीक पिशवीमध्ये हिरवट रंगाचा ओला सुका गांजा मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ हजार रूपये किमतीचा चार किलो ९५५ ग्रॅम गांजा, ६५ हजाराचे दोन मोबाईल व पाच लाखाची कार असा पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक देशमुख, उपनिरीक्षक किरण साळुंके, अंमलदार रमेश वराट, कैलास सोनार, राजू वैरागर, गोविंद गोल्हार,
विलास गारूडकर, रघुनाथ कुलांगे, राहुल द्वारके, सचिन धोंडे, संतोष आडसूळ, अरूण मोरे, समीर शेख, होमगार्ड साबीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस अंमलदार अजय नगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख पुढील तपास करीत आहेत.
0 Comments