शहरात गेल्या वर्षात खुनाच्या 105 घटना घडल्या आहेत. प्रेम,अनैतिक संबंध, चारित्र्याचा संशय अशा विविध कारणांतून हे खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पूर्ववैमनस्य, किरकोळ व घरगुती कारणांतून झालेल्या खुनांचेदेखील प्रमाण अधिक आहे. दिवसेंदिवस पुणे शहराचा आकार वाढतो आहे. जसा आकार वाढतो आहे तशी लोकसंख्यादेखील वाढते आहे. नोकरीच्या शोधात शहरात येणार्यांची संख्या मोठी आहे. त्यातूनच गुन्हेगारीदेखील वाढीस लागते आहे.
पूर्ववैमनस्य असलेल्या टोळक्यांकडून आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी गुन्हेगारी कृत्य केली जातात. त्यातूनच दोन टोळ्यांच्या संघर्षात नजरेला नजर भिडताच बंदुकीचा बार काढला जातोय अन् कोयत्याचा वार केला जातोय.
पूर्वीच्या वादातून शहरात अकरा जणांचे खून झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रेमसंबंधातून घडलेल्या खुनांचेसुद्धा मोठे प्रमाण आहे. एकेकाळी एकमेकांसोबत एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेणार्यांकडून एकमेकांचा काटा काढला जातो आहे.
कधी प्रियकराडून प्रेयसीचा 'गेम' केला जातोय, तर कधी प्रेयसीच आपल्या प्रियकराचा 'गेम' करते आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एक खून झाला आहे. किरकोळ कारणांतून झालेल्या खुनांच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तब्बल 45 जणांचे खून किरकोळ कारणांतून झाले आहेत. क्षणिक रागाचे कारण अशा खुनांच्या घटनांना प्रामुख्याने कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. तर घरगुती व कौटुंबिक वादातून 19 जणांचे खून झाले आहेत. वर्षभरात अज्ञात कारणातून 17 जणांचे खून झाले आहेत. त्यांचा खून नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला याचा पोलिसांना छडा लावता आलेला नाही.
शहरातील परिमंडळ चार आणि पाचच्या हद्दीत खुनाच्या तब्बल 69 घटना घडल्या आहेत. परिमंडळ चारमध्ये चतुःश्रृंगी, खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, विमानतळ, चंदनगर आणि लोणीकंद पोलिस ठाण्याचा, तर पाचमध्ये हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि लोणी काळभोर या पोलिस ठाण्यांचा समावेश होतो. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक गुन्हे घडताना दिसतात. त्यामुळे येथे खुनाच्या घटना अधिक असल्याचे दिसून येते.




0 Comments