पंढरपूर, दि. 12:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 व्या वर्धापन दिन 26 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात येणार असून, शासकीय ध्वजारोहण समारंभाचा कार्यक्रम रेल्वे मैदान, पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी प्रमाणे प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी संबधित विभागांनी यशस्वीपणे पार पाडावी अशा सूचना, प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व तयारीबाबत तहसील कार्यालय पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीस अप्पर तहसिलदार समाधान घुटूकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के.कोळी, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुंजकर तसेच पंढरपूर शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री.गुरव म्हणाले, प्रत्येक विभागाकडे कार्यक्रमासंबंधीची जबाबदारी दिलेली असते त्या अनुषंगाने ती यशस्वीपणे पार पाडावी. सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका प्रशासनाने मैदान स्वच्छ करुन, दगड व खडी काढून, पाणी टाकून रोलींग करावे.
तसेच शुध्द पिण्याच्या पाण्याची व अग्निशमन व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिका व प्रथमोपचार व्यवस्था उपलब्ध ठेवावी. उपस्थित मान्यवरांची बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था आदी व्यवस्था संबधित विभागाने करावी अशा सूचनाही प्रांताधिकारी श्री गुरव यांनी यावेळी दिल्या.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूर शहरातील शाळांमधील इयत्ता 5 वी ते 7 वी तसेच इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमधून लहान गटातून तीन व मोठ्या गटातून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात येऊन त्यांना प्रजासत्ताक दिना दिवशी सन्मानित करण्यात येणार आहे.
0 Comments