डोंबिवली - कामामधून सुट्टी मिळत नसल्याने पत्नी व मुलींना त्याला वेळ देता येत नसे. पत्नीला शिर्डीला देवदर्शनाला जाण्याचे पास मिळाले आणि तिने पतीकडे साईबाबा दर्शनाला जाण्याचा हट्ट धरला.
कुटुंबाला वेळ देण्यासाठी नरेश यांनी देखील कामावरून एक दिवसाची सुट्टी घेतली. आणि ही एक दिवसाची सुट्टी त्यांच्यासह पत्नी वैशालीच्या जीवावर बेतली.
शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. यात नरेश व वैशाली यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. आई वडिलांच्या निधनाने निधी व मधुरा या त्यांच्या दोन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी नाशिक येथील सिन्नर शिर्डी महामार्गावर शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. या अपघातात अंबरनाथ मधील मोरीवली गावातील नरेश उबाळे ( वय 38) व वैशाली उबाळे (वय 32) यांचा मृत्यू झाला आहे. मोरीवली गावात नरेश हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची पत्नी वैशाली ही याच गावातील एका कंपनीतील कपडा पॅकिंग करण्याचे घर बसल्या मिळणारे काम करत होती. याच कंपनीतून तिला शिर्डीला देव दर्शनाला जाण्याचे पास मिळाले. हे पास मिळाल्याने तिने पती नरेश याच्याकडे शिर्डीला जाण्याचा हट्ट केला. नरेश हा एका वाईन शॉप मध्ये काम करत असल्याने त्यांना जास्त सुट्टी मिळत नसे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी त्यांनी देखील पत्नी वैशालीचे म्हणणे ऐकले आणि एक दिवसाची सुट्टी घेतली. गुरुवारी रात्री 12 वाजता गावातून बस दर्शनाला निघाली होती.
नरेश यांना 3 मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण 17 सदस्य या शिर्डीच्या देवदर्शनाला गेले होते. नरेश देखील पत्नी वैशाली मुलगी निधी व मधुरा सह शिर्डीला निघाले. पहाटे झालेल्या अपघातात नरेश व वैशाली यांचा मृत्यू झाला. तर 9 वर्षीय निधी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
0 Comments