वडिलांना उपचारासाठी दवाखान्यात नेल्यानंतर अवघ्या दोन तासांत चोरट्यांनी भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून तब्बल ५ लाख ३० हजारांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेली.घटना विद्यानगर भागात घडली.
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नरेंद्र मुरलीधर तोष्णीवाल (रा. शुभम अपार्टमेंट, विद्यानगर) यांनी तक्रार दिली. नरेंद्र तोष्णीवाल हे अपार्टमेंटच्या फ्लॅट क्र. २ मध्ये राहतात. तर त्यांचे वडील हे फ्लॅट क्र. ४ मध्ये राहतात.
नरेंद्र यांचे वडील मुरलीधर तोष्णीवाल यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांना दर चार महिन्याला आकाशवाणी चौकातील एका हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी जावे लागते. त्यामुळे ते २७ जानेवारीला वडील मुरलीधर तोष्णीवाल यांच्या घराला लॉक लावून सकाळी ११ वाजता हॉस्पिटलसाठी दोघेही गेले होते.
दवाखान्यात उपचार झाल्यानंतर परत आले तेव्हा नरेंद्र याच्या फ्लॅट क्र २ मध्ये वडिलांनी जेवण केले. ते त्यांच्या फ्लॅट क्र. ४ कडे गेले असता, त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तुटलेले होते. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त होते. वडिलांनी घराचे कपाट तपासले असता, त्यातून साहित्याची चोरी झाली असल्याची माहिती समोर आली.
या घरातून दोन तासांच्या आत चोरट्याने २ लाख रुपये किमतीचे ४० ग्रॅमचे मंगळसूत्र, २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा सोन्याचे ४७ ग्रॅम वजनाच्या पाटल्या, सोन्याची पाच ग्रॅमची २५ हजार रुपये किमतीची अंगठी, सोन्याचे २० हजार रुपये किमतीचे २ ग्रॅम वजनाचे दोन नथी, सोन्याचे ७ ग्रॅम वजनाचे डायमंड असलेले ३५ हजार रुपये किमतीचे अंगठी, चांदीचा ५ ग्रॅमचा ७५०० हजार रुपये किमतीचा शिक्का, तसेच १५ हजार २५० रुपये रोख अशी एकूण ५ लाख ३० हजार ५५० रुपयांची मालमत्ता लांबविली.




0 Comments