२० लाखांचा गंडा घालणाऱ्यास अटक

औरंगाबाद : कंपनीची बनावट ओळखपत्रे, बँक स्टेटमेंट बनवून मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेला २० लाखांचा गंडा घालणाऱ्या आरोपींपैकी एकाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली.

ईश्‍वर प्रल्हाद पिसे (३३, रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव असून, त्‍याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी शाहीद साजिदुज्जमॉं यांनी रविवारी (ता.१९) दिले.


मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब जनार्दन उगले (रा. उदयनगर, सोसायटी समर्थनगर) यांच्या फिर्यादीनुसार सदर संस्‍था राज्यात जिल्हा पाणी, स्‍वच्‍छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्‍थेस पल्लवी हरीश खवणेकर, ईश्‍वर पिसे, सुदीप मोहरीर, दीपक सोनवणे,


संदीप कालमिले यांनी विविध कंपन्‍यांमार्फत ५० कोटींपेक्षा जास्‍त सीएसआर व इतर अनुदान निधी विविध सामाजिक कामासाठी मिळवून देतो, असे सांगून, सल्लागार शुल्क म्हणून २० लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादीने २६ एप्रिल २०२२ रोजी आरटीजीएसद्वा‍रे २० लाख रुपये विजय यादव याच्‍या रोशनी ट्रान्स्पोर्ट, मुंबई या बँक खात्‍यावर दिले. तसेच फिर्यादीने संस्‍थेची कागदपत्रे तपासणीसाठी दिले. कागदपत्रे तपासणीनंतर फिर्यादीने निधीसाठी आग्रह धरला.

१३ मे २०२२ रोजी पल्लवी खवणेकर हिने निधी नंतर देऊ असे सांगितले. १६ जून २०२२ रोजी खवणेकर हिने अगोदरची कंपनी निधी देणार नाही, दुसरी कंपनी महिंद्रा सस्‍टन प्रा. लि. मुंबई ही कंपनी देईल, कागदपत्रांसह प्रकल्प प्रस्‍ताव इतर बाबी तपासणीसाठी त्‍यांचे प्रतिनिधी येतील, असे सांगितले.


त्यानुसार आरोपी अमोल दीपक घोरपडे हा कंपनीचा प्रतिनिधी म्हणून फिर्यादीला भेटला. फिर्यादीला शंका आल्याने त्‍यांनी कंपनीचे कागदपत्रे तपासले असता ते बनावट असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात क्रांतीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला. तपासादरम्यान आरोपीने वीरसिंग राठोड,

मनीष रावत, विजय यादव यांच्‍या मदतीने गुन्‍हा केल्याची कबुली दिली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने वरील आदेश दिला. सुनावणीदरम्यान सहायक सरकारी वकील ए. व्‍ही. घुगे यांनी पोलिसांची बाजू मांडली.


Post a Comment

0 Comments