दोन लाखांच्या खंडणीसाठी धाराशिव जिह्यातून अपहरण करून सांगलीत आणलेल्या चार वर्षांच्या मुलाची शहर पोलिसांनी सुखरूप सुटका केली.
याप्रकरणी दोघांना पोलिसांनी जेरबंद करीत नळदुर्ग पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
धाराशिव जिह्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्वराज यल्लाप्पा चौगुले याचे अज्ञातांनी अनैतिक संबंधांच्या वादातून अपहरण केले होते.
अपहरणकर्त्यांनी दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही केली होती. याप्रकरणी मुलाच्या नातेवाईकांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे नळदुर्ग पोलिसांना पीडित मुलगा सांगली परिसरात असल्याची माहिती मिळाली.
या गुह्यातील संशयित किरण अविनाश लादे (रा. सलोनी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि त्याचे साथीदार किशोर शाहीर तांदळे या दोघांनाही पोलिसांनी जेरबंद करीत अपहृत मुलाची सुखरूप सुटका केली. अपहृत मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, असे देशमुख यांनी सांगितले.




0 Comments