नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस तोड कामगार ऊसतोड करण्यासाठी येत असतात. अशाच एका ऊसतोड करून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पहाटेपासूनच शेतात ऊसतोड सुरू होती. ऊसतोड सुरू असतानाच ट्रॅक्टर मध्ये ऊस भरण्याचेही काम सुरू होते. अशा वेळेला शेतातच असलेल्या दोन वर्षांची चिमुकली खेळत होती. कामाच्या व्यापात आई वडिलांना मुलीचा विसर पडला होता.
मुलगीही खेळत होती, त्यामुळे तिच्याकडे लक्ष देण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण त्याच वेळेला ऊसाने भरलेला ट्रॅक्टरच्या चाकाखाली मुलगी सापडली गेली. तिच्या अंगावर ट्रॅक्टरचे पुढील चाक गेले.
ट्रॅक्टर चालकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने ब्रेक मारला पण तो पर्यन्त उशीर झाला होता. मुलीचा जवळपास मृत्यू झाला होता. ही बाब चिमूकलीच्या आई वडिलांसह शेतात काम करणाऱ्या ऊसतोड कामगारांना कळली. त्यांनी तातडीने मुलीकडे धाव घेतली.
परिस्थिती पाहून चिमुकलीच्या आई वडिलांनी हंबरडा फोडला, उपस्थित सर्वच भयभीत झाले. ऊसतोड कर्मचारी रडू लागले होते. आणि चिमुकलीला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र चिमुकलीचा तोपर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता.
ट्रॅक्टर खाली मृत्यू झालेल्या चिमूकलीचे नाव जागृती प्रेमचंद जाधव असे आहे. ती दोन वर्षांची होती. जागृतीचे वडील प्रेमचंद जाधव हे मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील आहे. नाशिकच्या मांडसांगवी येथे ऊसतोड करण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात याबाबत जागृतीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आडगाव पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहे. ही संपूर्ण घटना ऊसतोड कामगारांमध्ये पसरल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतात काम करत असतांना ऊसतोड कर्मचाऱ्यांच्या मुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खरंतर मोलमजुरीसाठी अनेक ऊसतोड कर्मचारी वेगवेगळ्या भागात जात असतात. त्यादरम्यान त्यांच्या राहण्यापासून ते शिक्षणापर्यन्त अनेकदा बोललं जातं. मात्र, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0 Comments