आत्महत्या की घातपात ? बेपत्ता युवकाचा 28 दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा

 

कुरुंदा (हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथून 28 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका युवकाचा सांगाडा आज सकाळी वसमत तालुक्यातील सुकळी शिवारातील माळरानात सापडला आहे.


कृष्णा माधव तोरकड असे मृताचे नाव असून ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी कुरुंदा पोलिसांच्या पथकाने भेट दिली आहे.


कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील कृष्णा माधव तोरकड ( 26 ) हा युवक 2 मार्च रोजी गावातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी आ. बाळापूर पोलीस ठाण्यात त्याच्या पत्नीने तक्रार दिली होती. दरम्यान, तपास सुरु असताना आज सकाळी कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शिवारातील माळरानात दरीत एक सांगाडा आढळून आला. कपड्यावरून हा सांगाडा कृष्णाचा असल्याचे स्पष्ट झाले.


माहिती मिळताच सहा.पोलीस निरीक्षक गजानन मोरे,जमादार तुकाराम आम्ले, बापूराव वाभळे, आंबेकर, सिद्धिकी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदनच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही आत्महत्या आहे की घातपात यावर चर्चा सुरु आहे.


Post a Comment

0 Comments