थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून नऊ किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विठ्ठल जाधव (वय २२, रा. गुलबर्गा, कर्नाटक), शालिवान आप्पाराव वाडी (वय ३२, रा. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार संदीप गवारी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
थेरगाव येथील एका रुग्णालयासमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. तेथे पोलिसांनी एक संशयित कार अडवली.
कारची झडती घेतली असता त्यात दोन लाख ३१ हजार ५०० रुपयांचा नऊ किलो ३०० ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी कारमधील राहुल आणि शालिवान या दोघांना अटक केली व मोबाईल फोन, रोख रक्कम आणि गांजा
असा एकूण सात लाख ५२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.




0 Comments