मोहोळ - पंढरपूर मार्गावरील पुरातन जगदंबा मंदिर रातोरात पाडले

 

मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गावरील पोखरापूर येथील पुरातन जगदंबा मंदिर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांनी रातोरात पाडले. मात्र, देवीची मूर्ती हटविण्यात त्यांना अपयश आले आहे.


मंदिर हटविताना अधिकाऱयांनी मंदिराचे दगड जतन करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली. दरम्यान, मंदिर हटविल्यानंतर आक्रमक झालेल्या पोखरापूर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. रविवारी मूर्तीचा भंग होऊ नये, यासाठी पीओपी लावून साच्याच्या साहाय्याने देवीची मूर्ती काढण्याचे प्रयत्न चालू होते.


पोखरापूर येथील जगदंबा मंदिर मोहोळ-पंढरपूर पालखी मार्गाच्या मध्ये येत असल्याने मंदिराच्या प्रत्येक दगडावर आकडेवारी टाकून मंदिराचे दगड जतन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांनी मंदिरातील दगडावर आकडेवारी न टाकता शनिवारी रात्री मंदिर जमीनदोस्त केले. दरम्यान, आज सकाळी मंदिर पाडल्याचे समजताच पोखरापूर ग्रामस्थांनी सोलापूर-पंढरपूर पालखी मार्ग रोखून धरला होता. पोलीस निरीक्षक विनोद घुगे, उपनिरीक्षक राजकुमार डुणगे व गोपनीय विभागाचे नीलेश देशमुख यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.


उच्च न्यायालयाच्या आदेश असल्याने आम्ही जे शक्य होते, अशा दगडांवर नंबर टाकले आहेत. 20 मार्चपर्यंत मंदिरातील मूर्ती स्थलांतर करण्याचे आदेश असल्याने शनिवारपासून मी स्वतः येथे ठाण मांडून बसलो आहे. मूर्तीचा भंग होऊ नये, यासाठी पीओपी लावून साच्याच्या साहाय्याने मूर्ती सुरक्षितपणे काढण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. सर्व ग्रामस्थांच्या समोर आम्ही पुढील मंदिराचा प्लॅन ठेवून यापेक्षाही सुंदर मंदिर उभारून देणार आहोत.


Post a Comment

0 Comments