आगीतून 12 जनावरांची बाप- लेकीने केली सुटका , घर जळून खाक

 

भुदरगड तालुक्यातील पंडिवरे येथील विठ्ठल शेळवाडकर, रामचंद्र शेळवाडकर व बाबूराव शेळवाडकर या भावंडांच्या शेतातील घराला अचानक आग लागली. आग भडकून तिने घराशेजारी असणाऱया गोठय़ाला आपल्या कवेत घेतले.


गोठय़ात 12 जनावरे बांधली होती. हे पाहताच विलास गुरव व त्यांची कन्या समीक्षा यांनी धाव घेत सर्व जनावरांची सुखरूप सुटका केली. या बापलेकीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले.


भुदरगड तालुक्यातील पंडिवरे येथील शेतात विठ्ठल शेडवाळकर यांचे घर आहे. तीन भाऊ या घरात राहतात. बुधवारी दुपारी अचानक घराला आग लागली. घटनेची माहिती समजताच गावकरी मदतीसाठी धावले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग भडकत गेल्यामुळे गावकऱयांचे विझवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.


भडकलेली आग घराशेजारी असणाऱया गोठय़ाला लागली. गोठय़ामध्ये 12 जनावरे बांधली होती. ही घटना पाहताच जिवाची पर्वा न करता विलास गुरव व त्यांची कन्या समीक्षा यांनी गोठय़ाकडे धाव घेतली. या बाप-लेकीने बारा जनावरांची आगीतून सुटका केली. आगीच्या लोटातून घरात जाणेही शक्य नसताना दोघांनी प्रसंगावधान राखून जनावरांना बाहेर काढले. बाप-लेकीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments