सोलापूर: टिकटॉक स्टारच निघाला विहिरीतील पाणबुडी मोटारी चोर

 

सोलापूर - शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणबुडी मोटारी चोरी करणाऱ्या चौघांना जेरबंद करून सोलापूर तालुका पोलिसांनी त्यांच्याकडील पाच इलेक्ट्रिक मोटारी हस्तगत केल्या.


पोलिस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख आणि पुन्हा मैत्री झालेल्या तिघांच्या मदतीने मारुती ऊर्फ बाबा महादेव वाघमारे (रा. काटगाव, ता. तुळजापूर) याने विहिरींमधील विद्युत मोटारी चोरी केली. त्याला उमेश बाबासाहेब बोराडे, नागेश बापू कांबळे व मलकू मल्हारी गवळी (तिघेही रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांनी साथ दिली. सुशीलकुमार अंकुश जाधव (रा. कासेगाव, ता. दक्षिण सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी सुरवातीला बाबाला अटक केली.


सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चौघांना जेरबंद करून चौकशी केली. त्यांच्याकडून पाच पाणबुडी मोटारी हस्तगत केल्या आहेत. 

ही कामगिरी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पोलिस नाईक शशिकांत कोळेकर, पैगंबर नदाफ, फिरोज बारगीर, महादेव सोलंकर, वैभव सूर्यवंशी व सायबर पोलिस ठाण्याचे धीरज काकडे यांच्या पथकाने पार पाडली.


शेतकऱ्यांच्या विहिरींमधील पाणबुडी मोटारी चोरी प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून मारुती ऊर्फ बाबा वाघमारे हा फेमस टिकटॉक स्टार आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे ३० हजार फॉलोअर्स आहेत. त्यातून मार्डीतील तिघांची बाबासोबत ओळख झाली आणि त्यांची मैत्री घट्ट झाली. त्यानंतर त्यांनी मिळून कासेगावसह इतर परिसरातील विहिरींमधील विद्युत मोटारी चोरल्या. घटनास्थळी पोलिसांना दुचाकी मिळाली. त्यातून पोलिस तपासात ही लिंक समोर आली. दरम्यान, बाबासाहेब वाघमारे याच्याविरूद्ध नळदुर्ग पोलिसांत देखील असाच गुन्हा नोंद आहे.


Post a Comment

0 Comments