Pandharpur Live News: पंढरपूर तालुक्यातील शेतमजुराची मुलगी झाली कृषी अधिकारी; मुलींमध्ये राज्यात अकरावी

Pandharpur Live News :

जिद्द, चिकाटी, मेहनत आणि परिस्थितीची जाणीव असली की यशाच्या शिखराला गवसणी घालणे सोपे जाते, अशा भावना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत घेण्यात आलेल्या कृषिसेवा परीक्षा-२०२१ मध्ये पहिल्याच प्रयत्नात राज्यात ६१ वी तर मुलींमध्ये अकरावी रँक घेऊन तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली पूजा रघुनाथ थिटे हिने व्यक्त केल्या.

या यशामागे माझ्या आई-वडिलांचे कष्ट हीच प्रेरणा, असल्याचेही तिने सांगितले.


भोसे येथील शेतमजुराची मुलगी अधिकारी झाल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे. पूजा हिने अतिशय हलाखीच्या परिस्थितीत भोसे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व यशवंत विद्यालय येथून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे अकरावी व बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कृषी महाविद्यालय, कराड येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले व पदव्युत्तर शिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रवेश घेतला. २०२२-२३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या कृषिसेवा परीक्षेमध्ये राज्यात ६१ वा क्रमांक तर मुलींमध्ये अकरावा क्रमांक मिळवून पूजा उत्तीर्ण झाली आहे.

भोसे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, आपल्या गावाची शान वाढवली, तुझे अभिनंदन आणि तुझ्या यशाबद्दल आई- वडिलांनी घेतलेल्या अपार मेहनतीबद्दल त्यांचेही खूप-खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच अॅड. गणेश पाटील यांनी व्यक्त केली.

कष्टाला पर्याय नाही

आयुष्यात ध्येय निश्चित करून त्या दृष्टीने प्रयत्न केले तर यश हे मिळतेच. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे आणि परिस्थितीचे भान पाहिजे.

आई-वडिलांनी केलेले कष्ट आणि आपल्याकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षा याची जाणीव नेहमी स्मरणात पाहिजे. अभ्यास करताना काबाडकष्ट करणारे माझे आई-वडील मला दिसत असत. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतही मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. 'तू फक्त अभ्यास कर, मोठी हो, परिस्थितीचा विचार करू नकोस' ही त्यांची प्रेरणा या यशाला कारणीभूत असल्याचे पूजाने सांगितले.

कष्टाचे चीज झाले, पोरीनं पांग फेडला

आम्हाला दोन मुली असून दोन्हीही शिक्षणात हुशार. मोठी मुलगी टाटा कंपनीत नोकरीस तर दुसरी मुलगी तालुका कृषी अधिकारी झाल्याने आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.

मुलींच्या शिक्षणासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी हरकत नाही, परंतु त्यांना शिकवायचे, ही जिद्द मनाशी बाळगून त्यांना प्रोत्साहन देत गेलो. शिकण्याची जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि परिस्थितीची जाण या सगळ्या गोष्टी आम्हाला त्यांच्यामध्ये दिसत होत्या. त्यामुळे आम्हाला कष्ट करताना कोणताही त्रास झाला नाही. आज आमच्या कष्टाचं चीज झालं, आम्हाला सगळं मिळाल्याची भावना पूजाचे आई-वडील रघुनाथ थिटे व सुनीता थिटे यांनी व्यक्त केली.



Post a Comment

0 Comments