चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावरील उमरोली येथील एका वळणावर मोटारसायकलला झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात यश भगवान पालांडे (वय १८) व भावेश भगवान पालांडे (२१) (मूळ सार्पिली, ता.
खेड) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात काल (ता. १९) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास उमरोलीजवळ झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी ः भावेश व यश दोघेही मोटारसायकलने भरधाव वेगात मार्गताम्हाणेहून चिपळूणला जात असताना त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी मोरीच्या कठड्यावर जाऊन जोरदार आदळली.
यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. एक चाक तुटून लांबवर पडले होते. यावरून अपघाताची गंभीरता जाणवत होती. भरधाव वेगातील धडकेने दोन भावांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर काही वेळाने दुसऱ्याचादेखील मृत्यू झाला. हे दोघेही मार्गताम्हाणे येथे आपल्या मामाकडे राहायला होते, तर मार्गताम्हाणे येथील नातू कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. या दोन भावांच्या अपघातीमुळे मृत्यूमुळे मार्गताम्हाणेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मृतदेह विच्छेदनानंतर सार्पिली येथे मूळ गावी नेण्यात आले.
चिपळूण-गुहागर मार्गावरील रामपूर ते गुहागरदरम्यान रुंदीकरणाचे काम झालेले आहे. हा रस्ता काँक्रिटचा करण्यात आला आहे; मात्र रस्त्याची अनेक कामे बाकी आहेत. काही ठिकाणी बाजू पट्ट्या झालेल्या नाहीत तर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम बाकी आहे. उमरोली येथे ग्रामपंचायतनजीकच्या वळणावरील अपघातात दोन भावांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी यापूर्वी चारवेळा अपघात झाले आहेत.
0 Comments