भोगावती : मिरज पंढरपूर हायवेवर ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याने राधानगरी तालुक्यातील सरवडे गाव शाेकसागरात बुडाले अाहे. जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडकली. यात एकाच कुटुंबातील पाच जण मृत्यूच्या दाढेत सापडले.सरवडे गाावातील जयवंत पवार, अस्मिता पवार, सोहम जयवंत पवार, साक्षी जयवंत पवार, सावनी जयवंत पवार यांचा या अपघातात मृत्यू झाला.
सरवडे येथील पवार कुटुंबीय पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यासाठी राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील जीप भाडे तत्वाने घेतली होती, पण काळाने पवार कुटुंबियांना गाठले अन होत्याचे नव्हते झाले. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात समजली अन सर्वत्र फोन, मॅसेज सुरू झाले. एकाच कुटुंबातील पाच सदस्य मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अन दुर्दैवाचा फेरा आला
जयवंत पवार राधानगरी येथे तालुक्याच्या ठिकाणी बॉंड रायटर म्हणून कार्यरत आहेत. मनमिळावू स्वभाव, कामात सचोटी असणाऱ्या जयवंत पोवार यांच्या कुटुंबियांवर काळाने घाला घातला आहे. मुलांच्या सुट्टी निमित्त आपले कुटुंब आणि सासू, सासरे यांना घेऊन एसटीने पंढरपूरकडे जाणार होते. यासंदर्भात त्यांनी आपल्या भावकितील कांही जणांना विचारणा सुद्धा केली होती. अचानक सायंकाळी निर्णय बदलला अन शेळेवाडी येथील जीन भाड्याने गाडी घेऊन बुधवारी सकाळी सरवडे गावातून प्रस्थान केले. दोन तासात गावात अपघाताची बातमी थडकली. यामध्ये जयवंत पवार यांचे कुटुंब मृत्यूच्या जबड्यात सापडले.
नातेवाईक, ग्रामस्थांना अश्रू अनावर
एक मुलगा, दोन मुली शाळेत हुशार होती. संपूर्ण कुटुंब मृत झाल्याने शोककळा पसरली आहे. गावातील नागरिकांनी,भावकितील लोकांनी घराजवळ गर्दी केली, तर काही जण अपघात स्थळी गेले. या दुर्दैवी घटनेने जयवंत पवार यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले.
0 Comments