Pandharpur live : सोलापूरमध्ये भीषण अपघातामध्ये (Solapur Accident) तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शिक्षणानिमित्त हे तिघे मित्र पुण्याकडे (Pune) निघाले होते.
पण पुण्याला पोहचण्यापूर्वीच त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे घोंगडेवस्तीवर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या घोंगडेवस्ती येथे राहणारे तिघे मित्र पुण्याकडे निघाले होते. बाइकवरुन हे तिघेजण प्रवास करत होते. पण टेंभुर्णी येथे एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला तात्काळ सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला.
राज हळके, तेजस इंडी आणि गणेश शेरीकर अशी अपघातात मृत्यू झालेल्या तीन मित्रांची नावं आहेत. राज, तेजस आणि गणेश हे तिघेही घोंगडेवस्ती येथे राहत होते. बुधवारी मध्यरात्री ते शिक्षणासाठी पुण्याकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे घोंगडेवस्तीवर शोककळा पसरली आहे. हे तिघेही बसव प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिवप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, सांगलीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. विटा- महाबळेश्वर राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स आणि कार या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातातून सदानंद दादोबा काशीद हे बचावले असून ते जखमी झाले आहेत. अपघातातील जखमीवर उपचार सुरु आहेत.
0 Comments