शरद पवारांनी भाकरी फिरवली अन् महाराष्ट्राच्या राजकारणात पहिला भुकंप झाला ! दुसरा धक्का कोणता असणार ? राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण ?

 

Pandharpur Live Online:  महाराष्ट्रातील राजकारणात पंधरा दिवसांत दोन राजकीय भूकंप होतील, असा जो दावा अनेक जण करीत होते, त्यापैकी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा हा पहिला भूकंप म्हणावा लागेल. 

चोवीस वर्षांपूर्वी याच मे महिन्यात श्रीमती सोनिया गांधी यांच्या विदेशातील जन्माचा मुद्दा उपस्थित केला म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा व तारिक अन्वर या तीन नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. वीसेक दिवसांत तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने नवा पक्ष स्थापन केला. कालपरवापर्यंत या पक्षाला राष्ट्रीय दर्जा असला तरी प्रत्यक्षात पवारांचा महाराष्ट्र व संगमांचा मेघालय या दोन राज्यांमध्येच प्रामुख्याने त्याचे अस्तित्व राहिले. तारिक अन्वर यांच्या बिहारमध्ये तो रुजला नाही. पवारांच्या प्रभावामुळे कधी गोवा, कधी गुजरात, कधी केरळ विधानसभेत राष्ट्रवादीने प्रवेश केला खरा. परंतु, केवळ प्रतिनिधित्वापुरताच. या मर्यादेमुळेच पक्षाला लोकसभेत कधी दोन आकडी खासदार निवडून पाठवता आले नाहीत.

२००४ च्या निवडणुकीत ७१ जागा ही राष्ट्रवादीची महाराष्ट्रातील पक्षाची सर्वोच्च कामगिरी राहिली. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात चांगली कामगिरी नोंदविणाऱ्या राष्ट्रवादीला मुंबई व विदर्भात मजबूत पाय रोवता आले नाहीत. अर्थात, मर्यादा असूनही शरद पवार हेच इतकी वर्षे दिल्लीतील महाराष्ट्राची ओळख आहेत. राजकीय डावपेच व प्रशासकीय कौशल्य अशा दुहेरी वैशिष्ट्यांच्या नेत्यांची तगडी फळी राष्ट्रवादीने दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्वत: शरद पवारांनी चारवेळा भूषविले आणि ते पद भूषवू शकतील, असे डझनभर नेते राष्ट्रवादीत आहेत. तथापि, काव्यगत न्याय असा की आघाड्यांच्या राजकारणात या पक्षाला सतत उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले. राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण ही चर्चा महिनाभर सुरू आहे. त्यावेळी चर्चेत आलेली ही नकोशी वहिवाट मोडण्यासाठी राष्ट्रवादीने, खुद्द थोरल्या पवारांनी किंवा  अजित पवारांनी कंबर कसली की काय, अशी शंका शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे यावी. निवडणुकीच्या राजकारणापासून ते आधीच दूर आहेत. आता पक्षाध्यक्षपद सोडण्यामागे काही व्यूहरचना आहे, की ते खरेच समाजकारणाला अधिक वेळ देणार आहेत, हे लवकरच कळेल.

शरद पवारांच्या राजकीय चालींना नेहमी 'कात्रजचा घाट' अशी उपमा दिली जाते. समाजकारणाचा विचार केला तर पंढरीच्या वारीच्या वाटेवरील पवित्र दिवेघाटाचीही उपमा वापरता येईल. निवृत्तीच्या घोषणेचे राजकारण यातील कोणत्या घाटाने जाते हे पाहावे लागेल. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी केलेला निवृत्तीचा गौप्यस्फोट उत्स्फूर्त नव्हताच. आपल्या निर्णयाची पृष्ठभूमी व कारणमीमांसा करणारे त्यांचे छापील भाषण घोषणेनंतर लगेच समाज माध्यमांवर उपलब्ध झाले. आधी त्यांनी भाकरी फिरविण्याचा इशारा दिला होता. याचा अर्थ ही घोषणा पूर्वनियोजित होती. तसे असेल तर त्यामागे आणखी काही नियोजनदेखील असावे. जणू त्यांना भाकरीच काय, चुलीचीही दिशा बदलायची होती.

आपल्या आश्चर्यजनक, अकस्मात व सामान्यांना आकलन न होणाऱ्या राजकीय डावपेचांसाठी प्रसिद्ध असलेले शरद पवार विनाकारण काही करणार नाहीत. विशेषत: गेला महिनाभर त्यांचे पुतणे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अतिसक्रियता, भाजपशी त्यांची कथित जवळीक पाहता या निवृत्तीमागे काही शह-काटशहाचे राजकारण तर नाही ना, अशी शंका येणे साहजिक आहे. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी प्रमुख नेत्यांची एक समिती पवारांनी सुचविली असली तरी अजित पवार हे त्या पदाचे प्रमुख दावेदार आहेत. तसेही ते शरद पवार यांच्यानंतरचे पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेतच. विशेष म्हणजे पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेने धक्का बसलेले कार्यकर्ते-नेते एका सुरात निर्णय मागे घ्यावा, यासाठी विनवण्या करीत होते, अश्रू ढाळत होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही अशीच घोषणा केली होती व नंतर माघार घेतली होती, याची आठवण संजय राऊत करून देत होते, तेव्हा अजित पवार मात्र 'साहेब शब्दाचे पक्के आहेत, तेच पक्ष आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर नवा अध्यक्ष निवडला जात असेल तर तुम्हाला नको आहे का?', अशा शब्दात कार्यकर्त्यांना दटावत होते. तेव्हा, पक्षाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे दिले तर काय आणि पवार कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष निवडून नवी वाट चोखाळली तर काय, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एव्हाना मंथन सुरूही झाले असेल.

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण दादा की ताई ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद आणि राजकीय जीवनातून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवारांच्या या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला, तर महाराष्ट्राच्या राजकारणातही काहूर माजले आहे.

पवारांनी निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे, मात्र शरद पवारांच्या स्वभावानुसार ते त्यांचा निर्णय फिरवण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा आगामी अध्यक्ष कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार ही दोन नावे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत. पवारांच्या कुटुंबातच अध्यक्षपद राहील, अशीच दाट शक्यता आहे.

शरद पवार हे महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्व आहेत. आज त्यांनी 'लोक माझे सांगाती' या त्यांच्या राजकीय आत्मकथेच्या प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून मी दूर होत असलो तरी मी सार्वजनिक जीवनातून निवृत्त होणार नाही. मी विविध क्षेत्रात काम करत राहणार आहे. सार्वजनिक कार्यक्रम, बैठकांमध्ये भाग घेत राहणार आहे. मी पुणे, मुंबई, दिल्ली किंवा बारामती कुठेही असलो तरी सर्वांसाठी उपलब्ध असेल. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी २४ तास मी काम करत राहील.सुप्रिया सुळे यांनी १९ एप्रिल रोजी म्हटले होते, की दोन भूकंप होणार आहे. त्यातील एक तर काल झाला आहे. आता दुसरा धक्का कोणता असणार याची महाराष्ट्राला आणि देशाला उत्सुकता लागून राहिली आहे.

शरद पवारांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करण्यासोबतच पक्षामध्ये एक समिती नेमून नवीन अध्यक्षाची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.या समितीत एकही नाव हे पवार कुटुंबीयांपैकी एखाद्या नावाला विरोध करणारे नाही.

शरद पवार यांनी हा निर्णय अचानक आणि घाईघाईने घेतलेला नाही, हेही अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार यांच्या देहबोलीवरुन लक्षात येत होते. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या निर्णयाने सर्वजण अवाक झालेले असताना प्रतिभा पवार यांच्या चेहर्‍यावर मात्र कोणतेही आश्चर्याचे भाव नव्हते. सुप्रिया सुळेही कार्यकर्त्यांप्रमाणे गर्भगळीत झाल्या नाहीत किंवा त्यांना धक्का बसल्याचे जाणवले नाही. पवार कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होती. १ मे २०२३ लाच या निर्णयाची घोषणा करण्याची पवारांची इच्छा होती, याची माहिती स्वतः अजित पवारांनी दिली. त्यामुळे पवार कुटुंबाला या निर्णयाची आधीपासून माहिती होती, हे मात्र निश्चित.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ म्हटले जाणारे अंकुश काकडे, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी काही आमदारांशी फोनवर संपर्क केला होता. पक्षाची धुरा जर अजित पवारांकडे देण्यात आली तर आमदारांची मनःस्थिती काय असणार, हे तपासून पाहिले जात होते. पवारांच्या सांगण्यावरूनच पक्षाच्या आमदारांसोबत हा संपर्क करण्यात आला होता, अशीही माहिती आहे. अजित पवार यांच्या आजच्या बोलण्यानुसार नवा अध्यक्ष हा पवारांच्या मार्गदर्शनात तयार होईल. तो कुठे चुकला तर पवार त्याला दुरूस्त करतील, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार हे नक्की आहे. तो अध्यक्ष आता दादा असणार की ताई, एवढेच आता ठरायचे आहे.


Post a Comment

0 Comments