Pandharpur live = ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील बड्या नेतेमंडळींचं वऱ्हाड येत्या रविवार सात मे रोजी सोलापुरात असणार आहे. विशेषत्वे, शरद पवार हे शनिवारी सहा मे रोजी रात्री सोलापुरात मुक्काम ठोकणार आहेत.
त्याला कारणदेखील तसेच आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या परिवारामधील विवाह सोहळ्याला दस्तुरखुद्द शरद पवार आणि या पक्षामधील अनेक नेतेमंडळींची हजेरी लागणार आहे. या शाही विवाह सोहळ्याचे खास निमंत्रण श्री पवार यांनी स्वीकारले आहे. त्यातून त्यांचा हा सोलापूर दौरा निश्चित झाल्याचे सपाटे परिवाराच्यावतीने सांगण्यात आले.
सपाटे परिवारातील विवाह सोहळा ता.७ मे रोजी जुना पुना नाका परिसरातील शरदचंद्रजी पवार प्रशालेत सायंकाळी गोरज मुहूर्तावर होत आहे. या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने, वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह या पक्षामधील बडी मंडळी उपस्थित राहणार आहेत.
मनोहर सपाटे यांनी सोलापुरातील काही राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना घेऊन शरद पवार यांची भेट घेत त्यांना विवाह सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण श्री पवार यांनी स्वीकारले आहे. मनोहर सपाटे हे दीर्घ काळ राजकारणात आहेत. शरद पवार यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. शरद पवारांच्यामुळे त्यांना महापौरपद मिळाले होते. पवार परिवाराशी त्यांचे रुणानुंबंध आहेत.
पवारांच्या दौऱ्याबद्दल प्रंचड औत्सुक्य
विधान सभेमधील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाबद्दलचे अद्यापही थंड न झालेले वादळ, अजित पवार यांचे मुख्यमंत्रपदासाठी आलेले नाव, राष्ट्रवादीमधील आमदारांची अजित पवारांना पाठिंबा देण्यासाठी एकत्रीत आलेली फौज, अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लावले गेलेले फलक, अजित पवारांच्या भाजप प्रवेशाबद्दल खुद्द शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य पक्षांमधील नेतेमंडळींनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या पार्श्वभूमीवर, शरद पवार हे सोलापुरात येत आहेत.
त्यांच्या या दौऱ्यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीबद्दल सहा मे रोजी रात्री आणि सात मेला दिवसभर कोणाशी चर्चा करणार? काय खलबते घडणार? पंढरपूरचे साखर सम्राट अभिजित पाटील हे या दौऱ्यात शरद पवार यांना भेटणार का? सोलापूर जिल्ह्यातील उफाळलेल्या राष्ट्रवादीमधील गटबाजीवर तसेच विस्कटलेल्या राष्ट्रवादीच्या अनुषंगाने, शरद पवारांच्या दौऱ्याबद्दल या पक्षाचे नेते, पुढारी,पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांमध्ये प्रचंड औत्सुक्य राहणार आहे.
0 Comments