सातारा : अंधारी तालुका जावळी येथे तीन शेतकऱ्यांची बोगस दस्त करून फसवणूक करण्यात आली आहे. हे क्षेत्र साडेसहा एकर असून या प्रक्रियेमध्ये मूळ शेतकऱ्याच्या जागी बोगस व्यक्ती उभा करून दस्त नोंदवण्यात आल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. अंधारी येथील के. के. शेलार व शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कमलाकर भोसले यांनी या प्रकरणाची पत्रकार परिषदेत माहिती दिली
अंधारी तालुका जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार व लक्ष्मण रखमाजी शेलार यांना फसवून गावातील एजंट रवींद्र शेलार, संतोष सावंत व विजय कदम यांनी २०१३ मध्ये संबंधित जमीन क्षेत्र विकण्यासंदर्भातील करार मुंबईतील एका पार्टीशी केला होता. मुंबईतील जमीन खरेदी करणारा प्रशासकीय सेवेतील बडा अधिकारी आहे असल्याचे सांगण्यात आले. मात्र या प्रक्रियेमध्ये लक्ष्मण शेलार व रामचंद्र शेलार गणपत विठ्ठल शेलार यांची मिळून साडेसहा एकर शेती वनक्षेत्रात असून तेथे जाण्यासाठी पायवाट आहे. या तिघांचेही बोगस व्यक्ती उभ्या करून हा दस्त करण्यात आला आहे. ज्यावेळी रामचंद्र शेलार यांच्या नातवाने काही कामासाठी जमिनीचा सातबारा काढला असता त्यांच्या नावाचे क्षेत्र वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या फसवणुकीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अंधारी गावांमध्ये अशा बोगस व्यक्तींच्या नावे अनेक शेतकऱ्यांची जमीन दस्त प्रकरणाचा फसवणूक करण्यात आल्याचा संशय आहे.
न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू
शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कमलाकर भोसले म्हणाले, संबंधित शेतकरी हे वृद्ध असून त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उरलेले नाही. याप्रकरणी लवकरात लवकर न्याय मिळावा नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.
हा प्रकार गंभीर असून शेतकरी संघटना याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहे. या प्रकरणी जर न्याय मिळाला नाही तर ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण यासारखी तीव्र आंदोलने केले जातील.
-कमलाकर भोसले, शेतकरी संघटना, पश्चिम महाराष्ट्र


0 Comments