Pandharpur live news : करमाळा शहर व तालुक्यात रविवारी (दि. ४) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह पाऊस होऊन शेतक-यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या तुफानी वादळी पावसावेळी गुळसडी येथे शेतकरी महिलेचा वीज पडुन मृत्यू झाला.
कमल सुभाष अडसूळ (वय ४०) असे गुळसडी येथे विज पडुन मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आपल्या शेतात काम करून पती व मुलासह परत येत असताना सदरची घटना घडली. रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गुळसडी येथे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामध्ये अडसुळ वस्ती येथे मोठा पाऊस झाला. शेतात काम करत असताना पाऊस सुरु झाल्याने अडसूळ कुटुंब घरी परत निघाले. मुलगा व पती हे गाडीत होते. तर कमल या पावसात गाडीमागे चालत होत्या. घरा जवळ आले असताना तिला काळाने गाठले. यावेळी विजेच्या कडकडाटासह त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात त्या जागेवरच ठार झाल्या. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली व पती असा परिवार आहे. मृत कमल यांच्या एका मुलीचे नुकतेच लग्न झाले आहे. तर मुलगा ज्ञानेश्वर याने नुकतेच दहावी उत्तीर्ण केली आहे. याचा आनंद व्यक्त करत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आडसुळ परिवाराबरोबरच गुळसडी गावावर शोककळा पसरली. रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते गुळसडीचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसुळ यांच्या त्या चुलत भावजयी होत्या.
अन्नदात्यावर सुलतानी संकट आल्याने बळीराजा हवालदिल
गेल्या आठवडाभराच्या प्रचंड उष्म्यानंतर रविवारी (दि. ४) दुपारी आभाळ भरून आले. रोहिणी नक्षत्र व मृग नक्षत्राच्या दोन दिवसावरील जोडावर मान्सूनपूर्व विजेच्या कडकडाट व तुफान वादळी वा-यासह पाऊस झाला. शहर व ग्रामीण भागात विजेच्या कडकडाटासह तुफान वादळी वा-याने थैमान घातल्याने शेतक-यांचे उभ्या पिकांचे महिन्यात दुस-यांदा पुन्हा प्रचंड नुकसान झाले. करमाळा जेऊर, झरे, खडकेवाडी, पोफळज, उमरड, शेटफळ, वाशिंबे, चिखलठाण, कुगाव, केडगाव, शेलगाव, वांगी, सौंदे, वरकटणे, देवळाली, गुळसडी आदि भागात विजेच्या कडकडाटासह व वादळी वा-यासह जोरदार पाऊस पडला आहे. यामध्ये उभी केळी, पपई, मका, डाळींब कडवळ, ऊस, आंबा आदि पिके व झाडे जमीनदोस्त झाली आहेत. पहिल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीला अजुन महिनाही उलटला नाही, तसेच अद्याप शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई दिलेली नाही. पुन्हा अन्नदात्यावर सुलतानी संकट आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
0 Comments