मुंबईतील विरार परिसरातून धक्कादायक घटना समोर येत आहे. सतत होत असलेल्या कर्जाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सुरेश कर्नाकांती असं मृत तरुणाचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विरारमध्ये मेकॅनिकचं काम करत असलेल्या सुरेश कर्नाकांती याने काही लोकांकडून उसने पैसे घेतले होते. नोकरीत कमी पगार मिळत असल्याने त्याला उदरनिर्वाहासाठी आणि गरजा भागवण्यासाठी काही लोकांकडून पैसे घ्यावे लागत होते. परंतु कर्जाचा भार सतत वाढत असल्याने सुरेश कर्नाकांती गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. त्यामुळं शनिवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास सुरेशने खोलीतील बेडरुममध्ये जात स्व:ची नस कापून घेतली. त्यानंतर गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जामुळं आलेल्या डिप्रेशनमुळं त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज वर्तवला जात आहे. प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. त्यानंतर सुरेशचा मृतदेह खोलीतून बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यानंतर आता सुरेशवर कुणाचं किती कर्ज होतं, कर्जाच्या वसूलीसाठी त्याला कुणी छळलं होतं का?, या प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधली जात आहे. सोसायटीतील नागरिकांशी पोलिसांनी चर्चा केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नालासोपारा येथे एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर आता विरारमध्येही एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 Comments