सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्ड ने मध्यरात्री उचललं टोकाचं पाऊल... थेट डोक्यात गोळी झाडली!!



Pandharpur Live News Online : जळगाव: सचिन तेंडुलकर यांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे (वय 37) यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्रकाश कापडे हे SRPF मध्ये भरती झाले होते. त्यानंतर त्यांची पोस्टिंग होऊन ते मुंबई येथे सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून कर्तव्यावर होते. आठ दिवसांपासून कापडे मुंबई येथून जामनेर येथे आपल्या गणपती नगर येथील घरी आले होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. यावेळी घरातील सर्व झोपले होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर घरातील लोक धावत आले तेव्हा प्रकाश हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सुरक्षा रक्षक प्रकाश कापडे याचे शव उत्तरीय तपासणीकामी जळगावला रवाना करण्यात आले आहे. मात्र उत्तरीय तपासणी धुळे येथे केली जाणार आहे असेही म्हटले जात आहे. गेल्या सुमारे पंधरा वर्षांपासून एसआरपीएफच्या सेवेत असलेल्या प्रकाश कापडे यांनी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे सुरक्षारक्षकाचे काम केलं होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि 2 मुलं असा परिवार आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


Post a Comment

0 Comments