मुलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दुप्पट वाढ


पुणे – देशातील अल्पवयीन मुलांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून २0१२ च्या तुलनेत २0१३ मध्ये मुलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात दुप्पट वाढ झाली असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या अहवालात म्हटले आहे. यामध्ये उत्तरप्रदेशचा प्रथम क्रमांक लागतो. त्या पाठोपाठ मध्यप्रदेश आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यामध्ये अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील गुन्ह्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. चोरी, दरोडे, खून, मारामार्‍या, महिला व मुलांवरील अत्याचार त्याचबरोबर जाती-जातींमधील द्वेषांचे प्रमाण वाढत असून या वाढत्या गुन्हेगारीची पाळेमुळे इतकी घट्ट झाली आहेत की, त्यांचे उच्चाटन करण्यासाठी एक नवी यंत्रणाच निर्माण करावी लागणार असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) या संस्थेच्या अहवालावरून स्पष्ट दिसते. देशातील उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र आदी काही राज्ये नेहमीच गुन्ह्यांच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे पाहावयास मिळते, मात्र नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एनसीआरबीच्या अहवालानुसार २0१२ च्या तुलनेत २0१३ मध्ये मुलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
उत्तरप्रदेशमध्ये २0१३ मध्ये ९८५७ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. त्यापाठोपाठ मध्यप्रदेश ८२४७ आणि त्यानंतर तिसर्‍या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर लागत आहे. महाराष्ट्रात २0१२ च्या तुलनेत २0१३ मध्ये मुलांच्या अत्याचारामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. २0१२ मध्ये ३४५६ इतके प्रमाण होते तेच २0१३ मध्ये ६४१0 झाले आहे. मुलांच्या अपहरणामध्ये २0१२ ला उत्तरप्रदेश ४२३९, मध्यप्रदेश ६३0 व महाराष्ट्र ८९३ तर अनुक्रमे २0१३ मध्ये उत्तरप्रदेश ६00२, मध्यप्रदेश २२६२, महाराष्ट्र १६९८ इतकी नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments