मुंबई, गुरुवार, (प्रतिनिधी) - अतिरिक्त पोलीस उपमहानिरीक्षक सुनिल पारसकर यांच्याविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एका मॉडेलच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या मॉडेलने आपल्या लेखी तक्रार अर्जासोबत काही फोटो आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांना सादर केल्याने सुनिल पारसकर आता चांगलेच अडचणीत आले आहेत.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे सोपविण्यात आला असून चौकशीनंतर सुनिल पारसकर यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. एका वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकार्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद होण्याची ही पहिलीच घटना असून या घटनेने अन्य पोलीस अधिकार्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सुनिल पारसकर हे काही महिन्यांपूर्वी उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तेथूनच त्यांना बढती मिळाली आणि सध्या ते नागरी हक्क संरक्षण विभागात अतिरिक्त पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम करीत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना त्यांची ओळख गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत पिडीत मॉडेल असलेल्या एका तरुणीशी झाली होती. एका केससंदर्भात भेट झाल्यानंतर ती पारसकर यांच्या नेहमीच संपर्कात होती. त्यातून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि केससंदर्भात बोलणी करण्यासाठी पारसकर हे तिच्याशी लैगिंक चाळे करु लागले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी तिला मढ येथील एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तिथेच त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार असाच सुरुच होता. त्याला कंटाळून या मॉडेलने अलिकडेच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेऊन पारसकर यांच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीत तिने आपला विनयभंग आणि बलात्कार केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध काही फोटो आणि व्हिडीओ क्लिप पुरावा म्हणून सादर केले होते. या घटनेची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत मालवणी पोलिसांना सुनिल पारसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर काल रात्री उशिरा त्यांच्याविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यांचा तपास आता मालवणी पोलिसांकडून गुन्हे प्रकटीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आला असून त्याचा तपास पोलीस उपायुक्त शारदा राऊत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या पथकाने मढ परिसरातील संबंधित हॉटेलमध्ये जाऊन पंचनामा करुन संबंधित व्यक्तींची चौकशी केली होती. एका वरिष्ठ आयपीएस अधिकार्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने त्याबाबत अधिकृतपणे काहीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मॉडेलवर काही गंभीर स्वरुपाचे आरोप असून या आरोपाची आरे कॉलनी पोलिसांकडून शहानिशा सुरु होती. हा तपास थांबविण्यासाठी तसेच तिला पोलिसांकडून होणार्या त्रासापासून मदत करण्यासाठी ती पारसकर यांना भेटायला आली होती. यावेळी त्यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि या दोघांनी संमतीने शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र तिने पारसकर यांच्याकडून सतत येणार्या धमकीला कंटाळून त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्याचे बोलले जाते. तसेच तक्रार करताना तिने त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे जमा करुन ते पुरावे आपल्या लेखी अर्जासोबत पोलिसांना सादर केले. या पुराव्यानंतरच पारसकर यांच्याविरुद्ध विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलीस सूत्राने सांगितले
0 Comments