मराठीतला पहिला गँगस्टर चित्रपट `सॅटर्डे संडे’


गुन्हेगारी विषयांवर बॉलीवूडमध्ये अनेक वास्तववादी, प्रभावी सिनेमांची निर्मिती झाली असली तरी मात्र अपवादानेच मराठीत असे विषय हाताळण्यात आले आहेत. मराठीतल्या मकरंद देशपांडे दिग्दर्शित आगामी `सॅटर्डे संडे’ या पहिल्या गँगस्टर चित्रपटामुळे ही कसर भरून निघण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची अश्विनी राहुल इंटरप्रायजेस निर्मिती संस्थेने निर्मिती केली आहे. हिंदीतील ख्यातनाम दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या हस्ते नुकतीच एका शानदार समारंभात `सॅटर्डे संडे’ चित्रपटाची पहिली झलक दाखविण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण प्रसिद्ध निर्माता विपुल अमृतलाल शहा यांच्या हस्ते करण्यात आले. अनुराग कश्यप यांनी `सॅटर्डे संडे’चा फर्स्ट लूक हिंदीच्या तोडीचा असून चित्रपटाचे संगीत देखील उत्तम झाले असल्याचे कौतुक यावेळी केले.
अंडरवर्ल्डला असलेला छुपा पाठिंबा, त्यापासून अनभिज्ञ सर्वसामान्य जनता, त्यामधील अनिश्चितता असे असंख्य पैलू `सॅटर्डे संडे’ सिनेमात प्रेक्षकांना पाहता येतील. अंडरवर्ल्डमध्ये कुविख्यात असलेले, टोळीला नको असलेले शार्प शूटर पोलिसांच्या डेथ लिस्टवर येतात. सोमवारचा सूर्योदय पहायचा असेल तर आपापसातील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार-रविवार एकत्र जमावे लागेल असा निरोप येतो, तो ही राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीएकडून. त्यानंतर घडणाऱया रणधुमाळीत नक्की काय घडतं हे सिनेमात पाहणे मनोरंजक ठरणार आहे. चित्रपटाचे कथालेखन दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनीच केले आहे. चित्रपटाचे संगीत स्वप्नील नाचणे यांचे असून छायाचित्रण अनिल वर्मा यांनी केले. कला दिग्दर्शन राज राजेंद्र पाटील यांचे असून संकलक बिरेन यांचे आहे. `सॅटर्डे संडे’चा विषय गुन्हेगारी विश्वावर बेतलेला असल्याने अर्थातच यात ऍक्शनची `फुल ऑन ट्रीट’ असणार आहे. चित्रपटाचे ऍक्शन डिरेक्टर दीपक आणि विक्रम दहिया असून कार्यकारी निर्माता संतोष म्हस्के आहेत. ऍक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेल्या मकरंद देशपांडे दिग्दर्शित `सॅटर्डे संडे’ चित्रपटात मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, नेहा जोशी, अमफता संत, असीम हट्टंगडी, नुपूर, संदेश आदी कलाकारांच्या दमदार भूमिका आहेत.

Post a Comment

0 Comments