सांगोला शहरासह तालुक्यात श्री गणेशाचे स्वागत

सांगोला शहरासह तालुक्यात श्री गणेशाचे स्वागत

सांगोला / 

मागच्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर काल सांगोला शहरासह तालुक्यात घरोघरी त्याचप्रमाणे विविध मंडळांच्यावतीने गणपती बाप्पांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पावसाने शुक्रवारीही हजेरी लावल्याने गणेश भक्तांची तारांबळ उडाली असली तरी त्यांच्या उत्साहात कुठेही कमतरता जाणवत नव्हती.

सांगोला शहरातील शिवाजी चौक, जयभवानी चौक, नेहरू चौक, पोलीस वसाहतीसमोर व्यापार्‍यांनी गणपती व गौरींचे मुखवटे, सजावटीचे साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. मागच्या आठवडाभरात सतत व समाधानकारक झालेल्या पावसाने सर्वांच्याच चेहर्‍यावर समाधानाचे हसू उमटले आहे. निसर्ग कितीही कोपला तरी बाप्पा आपणास नाराज करणार नाहीत, अशी सर्वांची खात्री होती. झालेही तसेच काल सकाळपासूनच मागच्या आठ दिवसाप्रमाणेच पावसाने हजेरी लावली. काल दुपारपासून बाप्पांच्या आगमनाच्यावेळी सांगोले शहरात वरूणराजाचे जोरदार पुनरागमन झाले. त्यामुळे मिरवणूकीतील गणेश मंडळांची व कार्यकर्त्यांची धांदल उडाल्याचे चित्र दिसून येत होते. रस्त्यावरून व चौकाचौकात काही ठिकाणी पाणी वहात होते. छोटे गणेशभक्त या पावसाचा मनमुराद आनंद घेत ओले चिंब होऊन बेभान नाचत होते. मात्र, बाजारपेठेतील व्यापार्‍यांची अचानक आलेल्या पावसाने धांदल उडाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले.
सांगोले शहरातील शिवाजी चौकातील श्रीराम तरूण मंडळ, फाईट क्लब गणेशोत्सव मंडळ, कोष्टी गल्ली तरूण मंडळ, महादेव गल्लीतील आजोबा गणपती मंडळ, देशपांडे गल्ली येथील लोकमान्य गणोश मंडळ, पेठेतील सिद्धनाथ गणेश मंडळ, प्रियदर्शनी गणेश मंडळ, अमर गणेश मंडळ, साईनाथ गणेश मंडळ, नवमहाराष्ट्र संघ, भारत गल्ली गणेश मंडळ, बालगणेश मंडळ, वीर अभिमन्यू गणेश मंडळ, शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ, सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळ, मस्के कॉलनी, नवीन वसाहत, दत्तनगर व अन्य बर्‍याच ठिकाणी रात्री उशीरापर्यंत गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री गणरायाच्या आगमनानंतर मंगळवारी गौरींचे आगमन होत आहे. बुधवारी गौरी पूजन आहे. गौरी-गणपतीच्या काळात आपणाकडे परतीच्या मान्सूनचा थोडाफार पाऊस असतोच. त्यामुळे यावेळी हा पाऊस भरभरून बरसावा. सर्वत्र संपन्नता यावी, पिकपाणी चांगले व्हावे, शिवारात पिके डौलाने डोलावीत, मुक्या जनावरांची चारा पाण्याची सोय व्हावी, यासाठी गणेशभक्त बाप्पाकडे साकडे घालत आहेत.

सांगोला शहर व तालुक्यात दोन गणेश मंडळांचे अध्यक्ष मुस्लिम समाजातील असून या माध्यमातून सामाजिक एकोप्याचे दर्शन पहावयास मिळाले आहे. मांजरी येथील मोरया गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष रहिम तांबोळी तर चिंचोली रोड येथील रामरहीम मंडळाचे अध्यक्ष ईलाही मुजावर आहेत.विविध कार्यक्रम सादर करण्यास भरपूर वेळ मिळणार आहे. गणेशोत्सव शांततेने व भक्तीभावाने संपन्न व्हावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. शहरातील भारत गल्ली गणेशोत्सव मंडळाचे ५0 वे वर्ष आहे. सांगोला शहरातील अनेक गणोश मंडळांचे कार्यक्रम सर्वांनाच आनंद देवून जातात. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी काही मंडळे नेहमीच अग्रेसर राहिली आहेत.

Post a Comment

0 Comments