मंगळवेढय़ात उत्साहात 'श्री'ची प्रतिष्ठापना

श्रींची मुर्ती घरी घेऊन जाताना बालगणेशभक्त दिसत आहेत.


तालुक्यात २९ गावात 'एक गाव एक गणपती'चा उपक्रम राबविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान घरोघरी गणपती बप्पा मोरयाऽऽ च्या नामघोषात उत्साही वातावरणात 'श्री'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

शहरात ४३ मंडळांनी श्री गणेशाची बँजोच्या, ढोल ताशाच्या गजरात स्थापना केली. एस.टी. कर्मचारी, वीज वितरण कर्मचारी, अर्बन बँक कर्मचारी, पोलीस, बांधकाम खाते, कर्मचारी महासंघाच्या वतीने गणेशाची स्थापना केली. ग्रामीण भागात १३८ मंडळांनी 'श्री'ची स्थापना केली.

अनेक मंडळांनी जीप, टेम्पो, ट्रॅक्टर, कार, टमटममधून वाजत गाजत शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणुका काढण्यात आल्या. जुन्या पोलीस ठाण्याच्या पाठीमागे गणपतीमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारले होते. सकाळी ८ वाजलेपासून गणपती मूर्ती घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक कुटुंबात 'श्री'ची प्रतिष्ठापना केली जात असल्याने वातावरण मंगलमय बनले होते. मंडळांनी गणेशोत्सव कालावधीत सामाजिक उपक्रम, देखावे, विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे.


भोसे, रेड्डे, डिकसळ, तामदर्डी, उचेठाण, मानेवाडी, कात्राळ, सलगर खुर्द, जुनोनी, चिक्कलगी, बावची, आसबेवाडी, मारापूर, घरनिकी, सोड्डी, खडकी, लेंडवेचिंचाळे, बालाजीनगर, खुपसंगी या २९ गावात 'एक गाव एक गणपती'ची स्थापना केल्याची माहिती महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी दिली.

तालुक्यातील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचा कार्यक्रम आखला असून यामध्ये पाचव्या दिवशी ९, सातव्या दिवशी ५१, ९ व्या दिवशी ३८, ११ व्या दिवशी ८३ मंडळे विसर्जन करणार आहेत. डॉल्बी लावणार्‍यावर १ लाखाचा दंड व फौजदारी दाखल करण्याचा पवित्रा पोलीस खात्याने घेतल्याने मंडळांनी ढोल, ताशाच्या पारंपारिक वाद्यावर गणेश स्थापना केली. डॉल्बी विरहित मंडळांनी स्थापना केली. मरवणुकीदरम्यान एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, १७ पोलीस, ४0 होमगार्ड तसेच शिवप्रेमी चौक, मुरलीधर चौक, चोखामेळा फिक्स पॉईंट तर बोराळे, नंदेश्‍वर, हुलजंती, मरवडे औटपोस्ट येथे पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे.

Post a Comment

0 Comments