पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):- अखेर ३५ गाव पाणी योजनेला शनिवारी मुंबई येथे मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली. मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी पंढरपूर मतदार संघातील ३५ गावच्या जनतेसाठी दिलेला शब्द पाळला. यामुळे ही योजना आता होणार असल्याचे स्पष्ट झाले असून या योजनेला मुख्यमंत्री ना. चव्हाण हे मुख्यमंत्री निधीतून दोन दिवसात टोकन निधी देणार आहेत, अशी माहिती आमदार भारत भालके यांनी दिली.
दरम्यान, रविवारी मंगळवेढय़ात जल्लोष साजरा करण्यात आला. संत दामाजी साखर कारखान्यावर व्हा. चेअरमन सुर्यकांत ठेंगील व संचालक मंडळाने साखर वाटप करुन कामगार व उपस्थित शेतकरी यांच्यात आनंदोत्सव साजरा केला. मंगळवेढा शहरात अनेक ठिकाणी फटाके उडवून आनंद व्यक्त केला गेला. तर ३५ गावात पाणी संघर्ष समितीच्यावतीने फटाके उडवून, पेढे वाटप करुन आमदार भालकेंचे कौतुक केले गेले. गेली तीस वर्षे भिजत घोंगडे असलेला प्रश्न सोडविल्याबद्दल आ. भालके यांचे विशेष कौतुक केले जात आहे.
गेली पाच वर्षे सातत्याने या प्रश्नाकडे लक्ष देवून शासनाकडे पाठपुरावा केला. विदर्भ अनुशेष असल्यामुळे आंदोलन करुन हा प्रश्न सुटणार नव्हता. यासाठी सामंजस्यपणाने वस्तुस्थिती मांडून नैसर्गीक न्याय मिळविण्याची मोठी जबाबदारी होती. तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी ३५ गाव पाणी योजनेसाठी नाहरकत पत्र दिल्यामुळे या योजनेला प्रशासकीय मंजूरी मिळण्यास मोठी मदत झाली.
या मंजूरीमुळे आता ३५ गाव पाणी योजनेसाठी ६00 कोटी रुपयाची आवश्यकता असून योजना सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री स्वत: मुख्यमंत्री निधीतून टोकन निधी देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या योजनेसाठी औपचारिकरित्या टोकन निधी दिला जाणार आहे. दरम्यान, आ. भालके यांनी आता मी जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. आता जनतेला विचारुनच मी शब्द घेणार आहे. या शब्दात या ३५ गाव पाणी योजनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. मतदारसंघात येऊन सर्वांना विचारून मी निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहे. मी माझे काम केले आहे. आता माझा सर्व निर्णय मतदारसंघातील जनतेवर आहे.
शनिवारी रात्री १0.३0 वाजता मुंबईत मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचा निर्णय मंगळवेढय़ात समजताच तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात आला. अनेकांनी झोपलेल्यांना फोन करुन जागे करुन ही आनंदाची बातमी सांगितली. यामुळे अनेकांना आनंद झाला. बर्याच जणांनी तात्काळ आ. भालके यांना मुंबईत फोन करुन त्यांचे अभिनंदन केले. एकूणात गेल्या अनेक वर्षापासून चाळीस धोंडा, तेल धोंडा या नावाने दंतकथा बनलेली ही पाणी योजना आता प्रत्यक्ष अस्तित्वात येणार आहे. हे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, जलसंपदा मंत्री ना. शशिकांत शिंदे, पालकमंत्री ना. दिलीप सोपल, राज्याचे पाटबंधारे खात्याचे मुख्य सचिव, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक, अधिक्षक अभियंता तोंडे, कार्यकारी अभियंता नेताजी गोरे यांच्यासह नाशिकच्या डिझाईन विभागाने केलेल्या सहकार्यामुळे ही पाणी योजना मंजूर होवू शकली.


0 Comments