पंढरपूरकरांनो बाहेरील पदार्थ घेताना सावधान....

     
 पंढरपूर (पंढरपूर लाईव्ह):- पंढरपूरकरांनो आपल्या शहरात कांही स्विट मार्ट चालक शिळे पदार्थ विक्रीला ठेवताना आढळून आलेले आहे. काल रात्रीच स्टेशन रोडवरील एका नामांकीत स्वीट मार्ट मधून विकत घेतलेले मोतीचूर लाडू खाऊन उपरी(ता.पंढरपूर) येथील सुधाकर तुकाराम जाधव यांच्या मुलास उलट्या आणि जुलाबाचा त्रास चालु झाला. यासंबंधी ची तक्रार श्री.जाधव यांनी विनायक शेटे, अन्न निरीक्षक, पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे केली आहे. यावेळी शेटे हे कारवाई करताना दिरंगाई आणि ‘वेळखाऊ पणा’ करताना आढळल्याने यावेळी उपस्थित पत्रकारांनी याविरोधात आपला आवाज ‘बुलंद’ केला. तक्रारदार आणि अनेक नागरिक याठिकाणी संतप्त झालेले पहावयास मिळालेे. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे या स्वीट मार्ट मध्येच ठाण मांडून होते. त्यांनी शेटे यांना तात्काळ पुढील कारवाई करावयास सांगितले. शेटे यांनी साक्षीदार व तक्रारदारासमोर सदर मोतीचूर लाडू सीलबंद केलेले असून पुढील तपासणीसाठी पाठविलेले आहेत. 

       गेल्याच महिन्यात पंढरपूर येथील एका बेकरी मधून घेतलेला ब्रेड खाल्ल्यामुळे ‘फुड पॉयझनींग’ मुळे एका मुलाला हॉस्पिटलमध्ये अनेक दिवस अ‍ॅडमीट व्हावे लागलेले होते. या प्रकरणाबाबत चा पाठपुरावा ‘दै. पुण्यनगरी’च्या  17 ऑगस्ट, 18 ऑगस्ट आणि 19 ऑगष्ट 2014 च्या अंकामधून पुण्यनगरीचे पंढरपूर प्रतिनिधी श्री.कदम यांनी घेतला. (याबाबतचे पुण्यनगरीत प्रसिध्द झालेले वृत्त सोबत देत आहोत.)  यावेळी ही घटना दाबण्याचा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट जाणवले. मात्र प्रसिध्दी माध्यमांच्या रेट्यामुळे आणि बाधीत मुलाचे पालक,तक्रारदार सतीश सोनवणे यांनी अन्यायाविरुध्द पुकारलेल्या लढ्यामुळे संबंधीत अधिकार्‍यांना सदर बेकरी चालकावर गुन्हा दाखल करावा लागला.
स्टेशनरोडवर काल रात्री एका स्वीटमार्ट मधून दुषीत मोतीचूर लाडू खाल्याल्यामुळे आपल्या मुलास त्रास झालेला पहाताच हे लाडू घेणार्‍या ग्राहकाने तात्काळ या विरोधात आवाज उठवला आणि सदर स्वीट मार्ट चालकावर कारवाई झाली... या घटनेवरून ‘बेकरी मधील ब्रेड’ प्रकरणापासून नागरिक सतर्क झालेले आहेत. असे म्हणावयास हरकत नाही...
         पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असून येथील स्वीट मार्ट, बेकर्‍या व हॉटेल्स मधून विक्री केल्या जाणार्‍या खाद्य पदार्थांची तपासणी विनायक शेटे, अन्न निरीक्षक, पंढरपूर नगरपरिषद  यांनी वेळच्यावेळी   करावयास हवी मात्र त्यांच्याकडून याबाबत कोणत्याही गांभीर्याने काम केलेले आढळून येत नाही. ऑगस्ट महिन्यात कराड नाक्यावरील बेकरीमधील जो ब्रेड खाऊन एका मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला त्या ब्रेडवर कोणत्याही प्रकारची मॅन्यूफॅक्चरींग डेट नव्हती, एक्स्पायरी डेट नव्हती अथवा बॅच नंबरही नव्हता की बेकरी चालकाचे नांव सुध्दा नव्हते. अर्थात असे पॅकबंद परंतू त्यावर कशाचाही उल्लेख नसणारे पदार्थ कांही बेकर्‍यांमधून पूर्वी विक्री होत असत, आत्तासुध्दा बिनबोभाट विकले जातात.  ही घटना घडल्यानंतरही अशा प्रकारच्या पदार्थ विक्रींना पंढरपूरमध्ये प्रतिबंध का केला जात नाही? या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल तेंव्हा मिळेल. मात्र पंढरपूरकरांनो तुम्ही मात्र सावध रहा... सतर्क सहा... सणासुदीचे दिवस आहेत.. बाहेरील पदार्थ आणताना काळजी घ्या... आपल्या मुलाबाळांचे आरोग्याशी खेळ करणार्‍या अशा चांडाळांचा पर्दापाश आम्ही करूच... यामागे काय गौडबंगाल आहे ते तुमच्यासमोर आम्ही आणूच मात्र तो पर्यंत आपण सावध रहावे एवढेच... 

Post a Comment

0 Comments