ते पिंपळाचे झाड दिसे मज .....!.

            " मधुचंद्र " या काशिनाथ घाणेकरांच्या मराठी चित्रपटातील " ते चिंचेचे झाड " हे अवीट गोडीचे गाणे कोण विसरू शकेल ? . ग दि माडगुळकरांचे शब्द आणि महेंद्र कपूर यांचा खडा आवाज यामुळे हे गाणे अजरामर झाले . ओसाड माळरान बघून वैतागलेल्या प्रेयसीला प्रियकर सांगतो कि तू जवळ असल्यामुळे मला ते दूरवर दिसणारे चिंचेचे झाड काश्मिरच्या चिनार वृक्षा प्रमाणे भासते आहे आणि तू काश्मिरी तरुणी वाटत आहेस . या गीताच्या चालीवर मला काल थोडासा बदल करून " ते पिंपळाचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी " असे म्हणावेसे वाटले . समोर दिसणाऱ्या पिंपळाच्या झाडाने माझी अशी अवस्था करून टाकली .सासर वाडीच्या घरातून दिसणारे ते झाड बघून मला माझ्या लहानपणा पासून साक्षीदार असलेल्या एका पिंपळ वृक्षाची आठवण झाली . .

              आमच्या घरासमोर लोकमान्य विद्यालयाच्या अवाढव्य वास्तूतून हे पिंपळाचे झाड आभाळाला भेटायला निघाल्याप्रमाणे झेपावलेले होते . आमच्या घरातून ह्या पिंपळाचा डेरेदार विस्तार सहज दिसायचा . सकाळी आणि संध्याकाली त्याची पाने विलक्षण तेजाने चमकायची . माउलींचा सुवर्ण पिंपळ तो हाच असे मला वाटायचे . खास करून संध्याकाळी याच्या त्या पानांची सळसळ आणि त्यांचे तेज मनमोहक दिसायचे . त्याच्याकडे बघत बसावेसे वाटायचे . सकाळी जाग आल्यावर कूस बदलली कि याचेच प्रसन्न दर्शन व्हायचे. रात्री झोपायला माळवदावर गेल्यावर याची सळसळ ऐकून अंगावर काटा उभा राहायचा . या पिंपळावर एका घारीने घर केले होते . दिवसभरात बरेचदा ती फांदीवर बसलेली दिसायची . माझ्याकडे तेंव्हा एक साधी दुर्बीण होती . त्यातून मी या घारीचे निरीक्षण करायचो . शिट्टी वाजवल्यासारखी ती घार अधून मधून ओरडायची . खूप डौलदार दिसायची ती घार . कधी कधी काही कावळे या घारी शेजारी येउन बसायचे . आता काय होणार ? ही घार त्या कावळ्यांना मारणार का ? असा मला प्रश्न पडायचा पण त्या घारीने त्या कावळ्यांवर कधी हल्ला केल्याचे मी बघितले नाही . कदाचित त्या कावळ्यांचा क्षुद्रपणा तिला जाणवला असावा ..
      या पिंपळावर काही पोपटही येउन बसायचे . या पोपटा मुळे एकदा माझ्यावर मोठा अवघड प्रसंग ओढावला होता . तेंव्हा साखरेच्या गोल मोठ्या रुपयाच्या नाण्याच्या आकाराच्या गोळ्या मिळायच्या . मी पहिली , दुसरीत असेन . ही लिमलेटची गोळी तोंडात टाकून चघळत मी अंगणात बसलो होतो . सहज समोरच्या पिंपळा कडे लक्ष गेले . पोपटांचा थवा उडत उडत येउन पिंपळावर बसला होता . ते बघून " पोपट पोपट " करून मी ओरडलो . झाले . मी तोंड वर करून ओरडल्या बरोब्बर ती लिमलेटची गोल गोळी माझ्या घश्यात शिरली . माझा आवाज बंद झाला . माझी आई अंगण झाडत होती . पोरगं एकदम गप्प का झालं म्हणून तिने माझ्या कडे बघितलं तर मी डोळ्यात पाणी आणून कासावीस होऊन बसलो होतो. आईने माझ्याडे धाव घेतली . तिला काय करावे काहीच कळेना . माझी आज्जी घरातच होती . दोघींनी मिळून माझ्या घश्यातली गोळी काढण्याचे प्रयत्न सुरु केले . पाठीत बुक्क्या घातल्या . आईचे रडणे ऐकून गल्लीतले गोळा झाले . कुणी काय कुणी काय उपाय सुचवले . कुणी तरी म्हणाला " साखरेची गोळी आहे ना मग गरम पाणी पाजा गोळी विरघळेल " माझ्या आईने तो हि प्रयोग केला . काहीही असो पण माझा श्वास मोकळा झाला . मला बरे वाटू लागले . पुढे पिंपळावरचे पोपट बघितले की हा प्रसंग मला आवर्जून आठवायचा . .
        या पिंपळावर बरेच पतंग येउन अडकायचे . पण याची उंची ताडमाड असल्याने ते पतंग काढायचे धाडस कुणी करायचे नाही , या पिंपळाची पाने शिशिरात ढिगाने आमच्या दारात पडायची . त्यांच्या पिपाण्या करून वाजवत आम्ही लहानपणी फिरायचो . ती पिपाणी तोंडाकडे चपटी करण्यासाठी आम्ही तिला कपाळावर ठेऊन हाताचा तळवा तिच्या सुरळीवर मारायचो आणि गाणे म्हणायचो " माझी पिपाणी वाजू दे . हत्ती घोडा नाचू दे "................असा हा माझ्या जन्मापासूनच साक्षीदार असणारा पिंपळ लोकमान्य विद्यालयाच्या व्यवस्थापनाने शाळेच्या नूतनी करणाच्या वेळी काढून टाकला तेंव्हा खूप वाईट वाटले . बालपणापासूनच मित्र सोडून गेल्यासारखे वाटले . काल सासरवाडीला दिसलेल्या त्या पिंपळाने माझ्या आजोळीच्या पिंपळाची आठवण करुन दिली ..
         पृथ्वी गोल आहे हे खरं आहे , पटतंय मला .कोण कधी कुठल्या रुपात पुन्हा भेटेल आणि जुन्या आठवणींना उजाळा देईल सांगता येत नाही ." इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे , या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ! " खरं ना ? ..........

श्याम सावजी ......पंढरपूर

Post a Comment

0 Comments