श्री !....................................
. गणपती गेले कि
वेध लागतात ते नवरात्रीचे . घरो घरी स्वच्छता सुरु होते . अंगात रणचंडी संचारल्या प्रमाणे घरो घरी स्त्री वर्ग धुणी भांडी सारवण यांचा सफाया करून टाकतात . .........आमचं पुर्वीच घर साधं मातीचं चार पाच खोल्यांचं होतं . संपूर्ण घराला पिवडी ,काही खोल्यांना आकाशी रंग दिला जायचा . खालच्या बाजूने कावेचा पट्टा मारला जायचा .या निमित्ताने घरातले सगळे मांड , भांडी बाहेर निघून धुतली जायची . रंगवलेल्या घरात त्यांची पुन्हा मांडणी केली जायची . घर वेगळंच वाटायला लागायचं . घटस्थापने दिवशी मंडपी बांधून घटाची स्थापना केली जायची . हे घट उगवून येताना बघणे हा आमच्या कुतूहलाचा विषय असायचा . घरातले सदस्य धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने गोंधळी वगैरेंची या नवरात्रीच्या दिवसात वर्दळ असायची . घटा समोर देवीची गाणी वगैरे सादर व्हायची . त्यावेळी वाजणारा संबळ हा वाद्य प्रकार मला खूप आवडायचा . या वाद्या सारखा कडक आवाज दुसर्या कोणत्या वाद्याचा मला कधी वाटला नाही . अर्जुन नावाचा संबळ वादक नवरात्रीत आमच्या घरी यायचा आणि संबळ वाजवत देवीची गाणी म्हणायचा . त्याचं संबळ वाजवणं आणि गाणी म्हणणं हे दोन्ही इतकं तल्लीन होऊन असायचं कि बस्स . हे वाद्य आपल्याला कधी वाजवायला जमेल का असा मला तेंव्हा प्रश्न पडायचा . योगायोगाने राज्य नाट्य स्पर्धेसाठी " मुरळी " नावाचे नाटक आम्ही बसवले आणि त्यातील गोंधळयाची भूमिका मला मिळाली . हि भूमिका जिवंत व्हावी म्हणून मला व्यासपीठावर संबळ वाजवता आले पाहिजे असा दिग्दर्शक महोदयांचा ( पंढरीची वारी या मराठी चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक श्री रमाकांतजी कवठेकर )आग्रह होता त्यामुळे मला संबळ वाजवायला शिकावे लागले आणि त्यासाठी मी एका संबळ वादका कडे संबळ वाजवण्याचे रीतसर धडे घेतले . त्या वेळी मला बर्यापैकी संबळ वाजवता येत होते . काही वेळा आमच्या घरी अश्या प्रसंगी ज्या महिला उपस्थित असायच्या त्या पैकी काही जणींच्या अंगात यायचे आणि मग माझी पाचावर धारण बसायची .
माझ्या लहानपणी नवरात्रीत सार्वजनिक देवी बसवण्याचे प्रस्थ आजच्या इतके न्हवते . चोफाळयात बडकसच्या कोल्ड्रिंक हाउस समोर बसवली जाणारी एकमेव देवी मला आठवतेय . आता पंढरपुरात सार्वजनिक देवी बसवणाऱ्या मंडळांची संख्या खूपच वाढली आहे आणि त्यांची सजावट , देखावे , व्याख्यानमाला यांची रेलचेल सुरु आहे . सगळा आनंदी आनंद आहे ... जगदंब !

0 Comments