स्वर गंगेच्या काठावरती !

कवी शंकर वैद्य आपल्यातून गेले . आपल्या लिखाणाच्या ताकदीने आपल्याला साक्षात स्वरगंगेच्या काठावर नेउन उभे करणारे लेखक ,कवी . मोजकच काहीं लिहून आपली छाप कायम स्वरूपी रसिकांवर सोडणारे लेखक साहित्यिक विरळच . त्या पैकीच शंकर वैद्य .
महाविद्यालयीन दिवसात हिंदी गाण्यांचा भडीमार कानावर होत असतानाही काही मराठी गाण्यांनी माझी पाठ सोडली नाही त्यापैकीच हे एक गाणे " स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला , गतजन्मीची खूण सापडे ओळखले का मला ? " .......

." वदलीस तू मी सावित्री ती

शकुंतला मी, मी दमयंती ,

नाव भिन्न परि मी ती प्रिती

चैतन्याचा पूर तेधवा गंगेला पातला ""

जगण्याचं चिरंतन रहस्यच शंकर वैद्यांनी साध्या शब्दात या गीतातून उलगडलय . तसे आपण सगळेच जन्म जन्मांतरीचे सोबती मित्र . या पूर्वीचे हि कितीतरी जन्म आपली मैत्री असणार . त्या शिवाय का फेसबुका सारख्या माध्यमातून आपण एकमेकांना एवढा जीव लावला ? ऋणानुबंधाचे हे धागेच तर आपल्याला कुठल्याना कुठल्या माध्यमातून एकत्र आणतात . या गीतातल्या प्रेयसीने तेच तर सूत्र उलगडलय . चेहरा बदलला , शरीर बदललं पण ती प्रीतीची भावना तीच ओढ ,तेच समर्पण , तीच उत्कट भावना , तीच ती सावित्रीची सत्यवाना बद्दलची , शकुंतलेची दुष्यंता बद्दलची दमयंतीची नल राजा बद्दलची , .

" अफाट जगती जीव रजक:ण

दुवे निखळता कोठून मिलन ?

जीव भुकेला हा तुज वाचून

जन्मा मधुनी पिसाट फिरता भेट घडे आजला "

.या अफाट जगतात कुठला तरी दुवा आपल्याला घट्ट बांधून ठेवतो . जसं आपल्याला आता फेसबुकने बांधून ठेवलय . नाही तर कुणी कुणाला ओळखलं असतं ? हा साधा यांत्रिक दुवा जर आपल्याला एवढा घट्ट धरून ठेवतो तर मग जन्म जन्मांतरीच्या त्या धाग्यात किती ओढ असेल ! ती कशी तुटणार ? कशी संपणार ? आणि त्या वचनासाठी ,त्या शब्दा साठी पुन्हा हा जन्म . नातं स्वर्गीच बांधलय आता पृथ्वीतलावर त्याची ओळख पटण महत्वाचं. आणि हा दुवा तुटला तर ? ...........मग मिलन कुठले . .........
आमच्या जगण्याला आपल्या शब्दांनी समृद्ध करणाऱ्या शंकर वैद्यना आदरांजली !....................

श्याम सावजी ....पंढरपूर

Post a Comment

0 Comments