मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवी भाग १

श्री !

                                       मंगळवेढा रोडची घाडग्यांची देवी भाग १


अंबाबाई पटांगणातील देवी मंदिरातील पुजार्यांशी तात्विक मतभेद झाल्यावर आमच्या घरच्यांनी मंगळवेढा रोडच्या घडग्यांच्या देवीला जायला सुरुवात केली . पंढरपूरच्या अग्नेय दिशेला चंद्रभागेच्या काठावर हे मंदिर आहे यमाई तुकाई सोडली तर पंढरपुरच्या इतर चारही मुख्य देवी आग्नेय ,नैरुत्य ,वायव्य आणि ईशान्य या दिशांना आहेत . ( या पंढरपूरच्या सीमा रक्षक या उद्देशाने स्थापन केल्या गेल्या असाव्यात का ?) मंगळवेढ्याला जाणार्या रोडवर एक लहानशी किल्ल्या सारखी किंवा गढी सारखी पडकी वास्तू आहे त्यात हे देवीचे मंदिर आहे .मला लहानपणी किल्ल्यात आल्याचे समाधान येथे आल्यावर व्हायचे .आत भरमसाठ वाढलेली झाडी आजही आहे . या देवीच्या मंदिराकडे तसे दुर्लक्षच झाले होते तेंव्हा . पूर्वी एका लहानश्या पत्र्याच्या खोलीत देवीची मूर्ती होती. आता मोठे बांधकाम सुरु आहे .
अंबाबाई पटांगणातील देवीच्या माझ्या तितक्याश्या आठवणी नाहीत कारण तेंव्हा मी पाळण्यात होतो मात्र या देवीच्या बाबतीत माझ्या आठवणी ताज्या आहेत .
देवीच्या खोली बाहेर मोठ्ठा ओटा होता त्यावर मंदिराच्या पुजारीन बाई त्यांना आक्का बाई म्हणायचे त्या बसलेल्या असायच्या. वयस्कर होत्या आणि फटकळ . मंदिरातली शिस्त कोणी मोडली कि त्या रागवायच्या . याचा फटका मला पण बसला होता . त्यामुळे त्यांना मी खूप घाबरायचो . त्यांच्या कडेने आराधी , गोंधळी आणि भक्त महिलांचा गराडा असायचा . टांग्यातून पूजेचे साहित्य घेऊन आम्ही मंदिरात जायचो . माझ्या घरचे आक्का बाईशी गप्पा मारण्यात किंवा पूजेत गर्क झाल्यावर मी समोरच्या मैदानात खेळायला पळायचो . देवीच्या मूर्तीच्या समोर काही लहान लहान मंदिरे म्हणजे देवळ्या आहेत त्यात मरिआइ वगैरेंचे तांदळे आहेत . एक माकडाची मूर्ती आहे . या मूर्तीची कथा मी नंतर सांगेन . एक विटा आणि चुन्याची बनवलेली फारशी उंच नसलेली दीप माळ आहे . ही दीपमाळ आणि ती छोटी छोटी मंदिरे एका रेषेत असल्याने मला ते सगळे रेल्वे गाडी प्रमाणे वाटायचे . ती दीपमाळ म्हणजे रेल्वेचे धुरांडे आणि मागची ओळीत असणारी देवळे म्हणजे तिचे डबे . दीपमाळ आणि इतर देवळे यांच्या मध्ये मोकळी जागा होती त्यात बसून मी ती र्रेल्वे चालवल्याचा अभिनय करायचो . हा... हा... हा... जणू काही ते देवीचे मंदिरच मी ओढून नेत होतो . या दीपमाळे जवळ एक छोटेशे पांढर्या फुलांचे झाड होते . अगदी लहान उंचीचे पण बळकट . त्याच्यावर चढून त्याच्या फांद्या वरून उड्या मारायचाही उद्योग मी येथे आल्यावर करायचो ...
या मंदिराच्या आणखी काही आठवणी पुढील भागात वाचा... तो पर्यंत जगदंब !
                

.श्याम सावजी .........................पंढरपूर

Post a Comment

0 Comments