घाडग्यांची देवी ........भाग २

   श्री                                    घाडग्यांची देवी ........भाग २

                    मंगळवेढा रोडला   असणाऱ्या घाडग्यांच्या देवीच्या माझ्या लहानपणीच्या काही आठवणी मी मागील लेखात तुम्हाला सांगितल्या आज या देवी बद्दल मी लहानपणी ऐकलेला इतिहास सांगतो .
             घाडगे नावाचे सरदार या गढीत राहत होते . ते तुळजापूरच्या देवीचे भक्त होते . मात्र वयोमानाने शरीर थकल्याने त्यांना पूर्वीप्रमाणे तुळजापूरच्या वार्या जमेनात . घाडगे सरदारांना याची खंत लागून राहिली त्यांनी मनोमन देवीची माफी मागितली . एके रात्री तुळजा भवानी त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणाली , 
" चिंता करू नकोस आज पर्यंत तू माझ्याकडे माझी सेवा करण्यासाठी श्रद्धेने येत होतास आता तुला माझ्याकडे येणे जमत नाही हे मी जाणते . मात्र तुझ्या सेवेत खंड पडल्याचे दुखः तुला होऊ नये यासाठी मीच तुझ्याकडे येते . तुझ्या गढीतील विहिरीत मी आहे " सरदार स्वप्नातून जागे झाले . त्यांनी विहिरीत शोध घेतला . विहिरीतील कोनाड्यात त्यांना देवीची मूर्ती मिळाली . तीच हि आजची देवीची मुर्ती . सरदारांनी गढीतच तिचे छोटेसे मंदिर बांधले आणि तिथेच ते देवीची पूजा ,अर्चा ,सेवा करू लागले .आजही ती विहीर आणि त्या विहिरीतली मूर्ती सापडलेली देवळी तशीच आहे .
                       लहानपणी विहिरींची भीती वाटत असल्याने मी मंदिरा मागे असणाऱ्या या विहिरीकडे जात नसे . गढीचे भग्न अवशेष घाडगे सरदारांच्या वैभवाची साक्ष आजही देतात . गढीचे काही बुरुज आणि तट अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत . मुख्य दरवाजा भव्य आणि देखणा आहे . त्या जुन्या काळाची आठवण करून देत दिमाखाने उभा आहे . गढीच्या परिसरात भूतेश्वर महादेवाचे मंदिर आहे . त्याच्या समोर राम मंदिर आहे . ही गढी आणि गढीचा परिसर हा माझ्या साठी परम आनंदाचे ठिकाण आहे . इथली संध्याकाळ मला सर्वात सुंदर संध्याकाळ वाटते . या मंदिराच्या परिसरात बसून मावळतीला जाणारा सुर्य बघणे हा माझा आवडता छंद . काय नातं आहे माझं या गढीशी सांगता येत नाही ते या गढीतल्या देवीलाच ठाऊक . असो पुढील लेखातया गढीतल्या माकडाच्या मंदिराविषयी सांगेन . तो पर्यंत जगदंब ! 

-श्याम सावजी ..........पंढरपूर .

Post a Comment

0 Comments