घाडग्यांची देवी ....भाग ३
घाडग्यांच्या गढीत असणाऱ्या या देवी समोर काही छोट्या छोट्या बनवलेल्या देवळया सारख्या मंदिरांमधून काही तांदळे आहेत आणि बरोब्बर समोर एका थोड्या मोठ्या देवळीत एक माकडाची मूर्ती आहे . त्याबद्दल मी लहानपणी ऐकलेली माहिती अशी कि पंढरपुरातील प्रसिद्ध काळ्या मारुती मंदिरावर हे माकड रोज येउन बसायचे . लोकांना नंतर नंतर ते मारुती भक्त वाटू लागले . एक दिवस अचानक लाईटच्या तारेचा स्पर्श होऊन ते माकड मरण पावले . श्रद्धाळू लोकांनी या माकडाचे दहन करायचे ठरवले .आणि त्या नुसार टांग्यातून वाजत गाजत या माकडाची अन्त्ययात्रा काढण्यात आली . घाडग्यांच्या देवी जवळच पंढरपूरचे स्मशान आहे . तिकडे जात असताना काही जणांच्या डोक्यात कल्पना आली कि देवी समोर याला दफन करू आणि याचे मंदिर बांधू . त्यानुसार त्या माकडाला तिथे दफन करून त्याची मूर्ती तिथे बसविण्यात आली .लहानपणी हे माहित नसल्याने या मूर्तीला मी मारूतीच समजायचो मात्र कुठलेही वस्त्र किंवा आभूषणे अंगावर नसल्याने आणि बसण्याची पद्धत माकडाप्रमाणे असल्याने शंका येत होती . एक दिवस मंदिरात असलेल्या एका व्यक्तीला शंका विचारल्यावर त्याने हि माहिती दिली . काही जणांच्या मते हे माकड देवी भक्त होते म्हणून याचे इथे मंदिर बनवले .या मूर्तीला अत्तर लावल्यास आपली मनोकामना पूर्ण होते अशीही लोकांमध्ये श्रद्धा आहे .
काहीही असो पण माणसाच्या या पुर्वजाचे मंदिर बांधून माझ्या पंढरपूरकरांनी प्राण्यांबद्दल आपल्या मनात असलेली आपुलकी आणि श्रद्धा दाखून दिली आहे . जगाच्या पाठीवर एखाद्या प्राण्याचे बांधलेले मंदिर कुठे असेल नसेल पण माझ्या पंढरपुरात आहे याचा मला खूप खूप अभिमान आहे . प्राणी मित्र संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मला त्या लोकांचे खूप कौतुक करावे वाटते ज्यांनी हे माकडाचे देऊळ बांधले आणि माणसाच्या जगण्यात आपल्या निष्पाप , भोळ्या वागणुकीने आनंद फुलविणाऱ्या प्राण्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली.
. श्रद्धाळू पंढरपूरकरांनो सलाम तुमच्या श्रद्धेला .


0 Comments