'लोकपाल'मुळे ५0 टक्के भ्रष्टाचाराला आळा बसेल : अण्णा हजारे


    पंढरपूर (प्रतिनिधी):-  समाजाच्या, राज्याच्या हितासाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. आपल्या मागण्यांसाठी उपोषणे केली त्यामुळे 6 कायदे झाले. लोकपाल कायदा मंजूर झाल्याने पुढच्या काही दिवसांमध्ये 40 ते 50 टक्के भष्टाचाराला आळा बसेल असा विश्‍वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. 

येथील चंद्रभागा वाळंवटात ह.भ.प. लबडे महाराज फड व दिंडी क्र. 87 यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीकृष्ण सहस्त्रचंद्र दर्शन गुरू पुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. मारोती महाराज कर्हेकर यांचा विशेष सन्मान अण्णांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंढरपूर तसेच आळंदी येथील महाराज मंडळी उपस्थित होती. यावेळी पुढे बोलताना अण्णा म्हणाले, लोकसंख्या वाढत आहे मात्र, माणसं कमी होत चालली आहेत. मोठया प्रपंचात आनंद मिळतो. आळंदी हे माझे प्रेरणा स्थान आहे. त्याठिकाणी विविध मागण्यांसाठी चार वेळा उपोषणे केली. अलिकडच्या काळात माझे ते माझे आणि तुझ ते माझ असे म्हणण्याची प्रवृत्ती वाढली आहे. वयाच्या 26 व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांचे एक पुस्तक वाचनात आले आणि आपले संपूर्ण आयुष्य बदलून गेल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. सेवा म्हणचे विष्काम कर्म. फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करीत राहणे महत्वाचे असते. आळंदी येथे सुरू असलेले उपोषण आपल्या हस्ते सोडावे यासाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रर्यंसुरू होता. मात्र, ज्यांचे हात स्वच्छ आहेत त्यांच्या हातून उपोषण सोडणार असल्याचे सांगून मारोती महाराज यांच्या हस्ते आपण उपोषण सोडल्याचे त्यांनी सांगितले.ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी गुरूवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी कार्यकारी अधिकारी संजय तेली उपस्थित होते.कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी गोबंदी हत्या कायदा करणे आवश्यक असल्याचे सांगून नव्या शासनाच्या काळात नेमण्यात येणार्‍या मंदिर समितीमध्ये वारकरी प्रतिनिधी असावेत. वारकर्‍यांना चांगल्या सेवा सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी भावना अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments