’अल-कायदा’ची ’आयसिस’शी हातमिळवणीमानेसर : कुख्यात दहशतवादी संघटना ’अल-कायदा’ भारतावर हल्ला करण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तोयबा तथा सीरिया व इराकमध्ये रक्तरंजित कारवाया करणार्या ’आयसिस’च्या दहशतवाद्यांसोबत हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा ’राष्ट्रीय सुरक्षा गार्ड’चे (एनएसजी) महासंचालक जयंत चौधरी यांनी गुरुवारी येथे बोलताना केला आहे.
देशातील अनेक शहरांवर दहशतवादी हल्ल्यांचे सावट आहे. ’अल-कायदा’ देशात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करून हे हल्ले घडवू शकते. ते भारतातील पर्यटन स्थळांना लक्ष्य करू शकतात किंवा महत्त्वाच्या ठिकाणांवर आत्मघातकी हल्लेही घडवून आणू शकतात, असे जयंत चौधरी म्हणाले. इंडियन मुजाहिद्दीन, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि ’आयसिस’ यासारख्या दहशतवादी संघटना एकमेकांसोबत हातमिळवणी करून एकाच वेळी भारतातील विविध शहरांवर हल्ले करू शकतात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ’अल-कायदा’च्या दहशतवाद्यांनी वर्षभरापूर्वी गोवा, बंगळुरू आणि अमृतसरमधील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यामुळे अल-कायदाच्या हल्ल्याची भीती नवी नाही. स्थिती पाहता भारतीय सुरक्षा जवानांनीही एकाच वेळी अनेक शहरांत दहशतवादी हल्ले होण्याच्या स्थितीत त्याचा सामना करण्याची तयारी सुरू केली आहे, असे ते म्हणाले.
सद्य:स्थितीत दहशतवाद अत्यंत उग्र बनला असून, मुंबईवरील 26/11 चा हल्ला त्याची एक झलक होती, असेही चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे, सुरक्षा यंत्रणांनी यापूर्वीच सरकारला ’अल-कायदा’ भारतात आपले पाय रोवण्यासाठी प्रतिबंधित ’स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात ’सिमी’शी हातमिळवणी करत असल्याची पूर्वकल्पना दिली आहे.
दरम्यान, ’अल-कायदा’चा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने नुकतेच एका व्हिडीओद्वारे भारतावर दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी ’अल-कायदा’वर विशेष लक्ष पुरवले आहे.

0 Comments