"फडणवीस सरकार" च्या राज्यकारभाराला प्रारंभ....

           मुंबई (पंढरपूर लाईव्ह):- महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या सरकारची मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात रोवली गेली... हायटेक यंत्रणा... मोठ्ठा डामडौल आणि सर्वपक्षीय नेते तसेच साधु-संतांची उपस्थिती या सोहळ्याचे वैशिष्ट्ये ठरले. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडीयमवर कोट्यावधींचा खर्च केल्याबद्दल विविध स्तरातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र देवेंद्र फडणवीस सारखे एक अभ्यासू, उच्चशिक्षीत संयमी नेतृत्व गुण असणार्‍या नूतन मुख्यमंत्र्यांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.


           विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण या महाराष्ट्रातील विविध भागांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. त्या सर्व समस्यांचा बारकाईने अभ्यास करून सर्वांना एकच न्याय या पध्दतीचा विकासाचा नवा कार्यक्रम नुतन सरकारला राबवावा लागेल. महाराष्ट्राच्या जनतेने ‘भाजपावर’ विश्‍वास ठेवून लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणूकीत भाजपा च्या बाजूने आपला ‘कौल’  दिला आहे. ‘फडणवीस’ सरकार जनतेच्या विश्‍वासास पात्र रहाण्यासाठी कामाला लागलेले असून त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत अशी जनतेची आकांक्षा आहे.

              देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 27 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह हजारोंच्या उपस्थितीत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वानखेडे स्टेडियममधील शामियानात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासमवेत सात कॅबिनेट तर दोघा राज्यमंत्र्यांनीही या वेळी शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल मौन पाळत 122 आमदारांचे संख्याबळ असताना भाजपा सरकारचा शाही शपथविधी सोहळा शुक्रवारी संध्याकाळी वानखेडे स्टेडियमवर संपन्न झाला. दुपारपासूनच भाजपाच्या कार्यकर्त्यांची कार्यक्रमाच्या ठिकाणी रीघ लागली होती. चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. दरम्यान, शपथविधी समारंभ संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाची सूत्रे हाती घेत आपल्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेऊन धडाक्यात कामकाजही सुरू केले. 

      
वानखेडे स्टेडियममध्ये दुपारी तीन वाजल्यापासूनच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे आगमन सुरू झाले. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद, अनंतकुमार, प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री रमण सिंह, वसुंधरा राजे शिंदे, आनंदीबेन पटेल त्याचप्रमाणे प्रकाशसिंह बादल, चंद्राबाबू नायडू, रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, पृथ्वीराज चव्हाण, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे, वेगवेगळ्या धर्मांमधील धर्मगुरू, अनिल अंबानी आदींची उपस्थिती जाणवत होती. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, संरक्षणमंत्री अरुण जेटली तसेच फडणवीस यांनी दूरध्वनीवरून विनंती केल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले. ठाकरे येणार असल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे नेते दिवाकर रावते तसेच इतर आमदार वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. त्यामुळे स्टेडियमबाहेरच उभे राहून त्यांना स्क्रीनवर कार्यक्रम बघावा लागला. पद्मजा फेणाणी, नाना पाटेकर यांनाही प्रवेशद्वारावरच थांबावे लागले. नाना पाटेकर यांनी तर वैतागून निमंत्रणाचा पास भिरकावत काढता पाय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर आदींची गैरहजेरी लक्षात येत होती. सव्वाचार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांचे स्टेडियमवर आगमन झाले. त्यानंतर ४ वाजून २६ व्या मिनिटाला शपथविधीचा कार्यक्रम सुरू झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापाठोपाठ एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश महेता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे तसेच विष्णू सवरा यांना कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली. दिलीप कांबळे तसेच विद्या ठाकूर यांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. सर्व मंत्र्यांनी ईश्‍वराला साक्ष ठेवून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. विनोद तावडे यांनी शपथ घेताना आपले वडील श्रीधर यांच्याबरोबरच आई विजया यांच्या नावासह शपथ घेतली. ४ वाजून ५२ व्या मिनिटाला म्हणजेच अवघ्या २६ मिनिटांमध्ये शपथविधीचा समारंभ संपला.फडणवीस सरकार लागले...ल्ले 1 स्निेसर्व मागास विभागाचा अनुशेष दूर करण्याला आपले प्राधान्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. महाराष्ट्राला पूर्ववत पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments