पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):- काल दि. 26 जुन 2015 रोजी सायंकाळची वेळ... पंढरपूर शहर पोलिस ठाणे परिसराला वाहनतळाचे स्वरुप प्राप्त झालेचे चित्र यावेळी पंढरपूरकरांना पहावयास मिळाले. वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मॉडलची अनेक चार चाकी वाहने उभी असलेली.. या गाड्यांच्या मालकांची-चालकांची व अमक्याची गाडी सोडा... तमक्याची गाडी सोडा... अशी विनंती पोलिसांना करणार्या अनेकांची पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तोबा गर्दी जमलेली होती.
पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे पी.एस.आय. श्री.गोपाळ चावडीकर यांनी आपले वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पदग्रहण केले पासूनच पंढरपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट नेमून आपल्या फौजफाट्यांसह विना नंबर प्लेट, अपुरी कागदपत्रे, बनावट कागदपत्रे अथवा बेकायदेशीर वाहतुक करणार्या अनेक चार चाकी आणि दुचाकी वाहनांवर कारवाईचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या या कार्याचे पंढरीतील सर्वसामान्य नागरिकांकडून कौतुक होत आहे. अशाच प्रकारे काल दि. 26 जुन रोजी त्यांनी सोलापूर आरटीओ चे अधिकारी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहन पांडकर, श्री.खैरनर आणि पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे 15 ते 20 पोलिसांसह वेगवेगळ्या ठिकाणाहून बेकायदेशीर असलेली 40 वाहने ताब्यात घेवून ती शहर पोलिस ठाण्याच्या आवारात लावली. यावेळी कोणत्याही प्रकारचा अन्य व्यक्तींचा हस्तक्षेप टाळत त्यांनी 40 पैकी 5 ते 6 वाहनांवर दंडात्मक कारवाई करत 12000/- रु. दंड जमा करुन घेतला असून उर्वरीत सर्व वाहनांवर विविध कलमान्वये खटले दाखल करुन ही सर्व वाहने सोलापूर आरटीओ कार्यालयाचे ताब्यात देण्यात आलेली आहेत.यावेळी अनेक वाहन मालकांनी वेगवेगळ्या पध्दतीने मध्यस्थी च्या सहकार्याने कांही जमले तर आपले वाहन सोडवून घेता येईल का? याबाबत प्रयत्न चालवले असल्याचे दिसून आले. मात्र सबंधीत अधिकार्यांनी कायदेशीररित्या कारवाई करुन आपल्या कर्तव्याचे पालन केल्याचा सुखद धक्का सर्वसामान्य पंढरपूरकरांनी काल अनुभवला.





0 Comments