पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 19 ऑक्टोबर 2015
वारी
कालावधीत चंद्रभागा वाळवंट वापराबाबत
नियोजन
बैठक संपन्न
पंढरपूर दिनांक १७ :- मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वारी कालावधीत
चंद्रभागा नदीचे वाळवंट वापरण्याबाबत नियोजन करण्यासाठीची बैठक उपविभागीय
अधिकारी संजय तेली यांच्या अध्यक्षतेखाली
वारकरी-फडकरी यांच्यासमवेत बैठक संपन्न झाली. या बैठकीस तहसिलदार गजानन गुरव,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे
यांच्यासह प्रमुख वारकरी व फडकरी उपस्थित
होते.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
वर्षातून 20 दिवस वाळंवट वापरण्यास अनुमती दिल्यानुसार कार्तिकी वारीसाठी शुद्ध नवमी ते शुद्ध
पोर्णिमे पर्यंत 7 दिवस, माघी वारीसाठी
शुद्ध नवमी ते शुद्ध त्रयोदशी पर्यंत 5 दिवस, चैत्रीवारीसाठी शुद्ध दशमी ते शुद्ध
द्वादशीपर्यंत 4 दिवस आणि आषाढीवारीसाठी शुद्ध दशमी ते शुद्ध द्वादशीपर्यंत 3 दिवस
असे एकूण 19 दिवस आणि कार्तिकी व चैत्री
वारीस एकादा दिवस वाढल्यास एक दिवसा वाढवावा असे बैठकीत सूचित करण्यात आले.
याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर केला जाईल असे उपविभागीय अधिकारी श्री.
तेली यांनी बैठकीत सांगितले.
मा. उच्च न्यायालयाच्या
आदेशानुसार तंबू/मंडपामध्ये रात्रौ निवास तसेच स्वयंपाक करता येणार नाही. नदीपात्र
दुषित होणार नाही याची दक्षता सर्व सबंधितानी घ्यावी अशा सूचनाही बैठकीत देण्यात
आल्या. तंबू/मंडपासाठी परवानगी दिलेल्या कालावधीनंतर ते तात्काळ काढून घेण्याची
जबाबदारीही सर्व संबंधितांची राहील असेही बैठकीत सांगण्यात आले.
000000
कार्तिकवारीत
विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडावी
-उपविभागीय अधिकारी संजय
तेली
पंढरपूर दिनांक १७ :-
कार्तिकवारी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागास दिलेली जाबाबदारी व कामे वेळेत पूर्ण करावीत तसेच त्यांनी आपली
जबाबदारी चोख पार पाडावी अशा सूचना उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिल्या.
कार्तिकीवारीत करावयाची
कामे आणि नियोजन याबाबतचा आढावा घेण्यासाठी सांस्कृतिक हॉल येथे आयोजित बैठकीत ते
बोलत होते. बैठकीस तहसिलदार गजानन गुरव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे,
पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.
श्री. तेली म्हणाले,
आषाढीवारीत ज्या पद्धत्तीने काम केले त्याच पद्धतीने कार्तिकीवारीत काम
करावे. येणाऱ्या भाविकांना याबाबत समाधान
आणि बदल दिसून यावा. विभागांना नेमून दिलेली कामे वारीपूर्वी पूर्ण होतील याकडे
कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक आहे. नगरपालिकेने स्वच्छता पथके कार्यरत ठेवण्याबरोबरच
पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी नियोजन करावे. यात्रा कालावधीत मोकाट जनावरांचा
बंदोबस्त व पार्किग व्यवस्थेबाबत नियोजन करावे.
महावितरण विभागाने तात्पुरते वीज कनेक्शन तसेच वीज पुरवठा अखंडित
राहील याबाबत योग्यती खबरदारी घ्यावी. सार्वजनिक
बांधकाम विभागाने रस्त्यांबाबची कामे वेळीच पूर्ण करावीत. मंदिर समितीने दर्शन मंडपात सीसीटीव्ही कॅमरे
बसविण्याबरोबरच आसीयु सुरु ठेवावा. मंडपातील जिणे स्वच्छ ठेवण्याबरोबरच दर्शन
मंडपात स्पीकर लावावेत. बाजार समितीने किमान 100 शौचालये उभी करण्याबरोबरच नियंत्रण
कक्ष 24 तास सुरु ठेवण्यासाठी नियोजन करावे. गुरांच्या बाजाराच्या ठिकाणी
पशुवैद्यकीय सेवा कार्यरत ठेवाव्यात. याबरोबच
भाविकांसाठी मदत केंदे सुरु करण्यात येणार असून याचे नियोजन तहसिलदार यांनी
करावे. तसेच त्यांच्याकडील कामकाजाचा आढावा घेऊन पथके निर्माण करावीत व संपर्क
केंद्राचे नियोजन करावे. बीएसएनएल, अन्न व औषध प्रशासन, एस. टी. महामंडळ, पंचायत
समिती यांनी त्यांच्याकडील कामे मुदतीत पूर्ण करावीत अशा सूचना बैठकीत देण्यात
आल्या.
00000
महाराजस्व अभियान विस्तारीत समाधन योजनेंतर्गत
20 ऑक्टोबर रोजी मेळाव्याचे आयोजन
पंढरपूर दिनांक १७ :-
महाराजस्व अभियान विस्तारीत समाधन योजनेंतर्गत उजनी कॉलनी शेजारील सांस्कृतिक भवन
येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2015 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती
उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनी दिली. या मेळाव्याचे उद्धघाटन पुणे विभागीय
आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि पोलीस अधीक्षक विरेश प्रभू
यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हा मेळावा दि. 20 रोजी
सकाळी 10 ते 5 या वेळेत होणार असून मेळाव्यात महसूल, कृषि, जिल्हा परिषद, एस.टी. महामंडळ, जलसंपदा, भूमि अभिलेख, सहकार,
पशुसंवर्धन, नगरपालिका, पोलीस, बीएसएनएल, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, अन्न व औषध
प्रशासन, उत्पादन शुल्क या विभागाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत.
मेळाव्यामध्ये नागरीकांना
संबंधित विभागाची माहिती देण्याबरोबच त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात येणार आहे.
या दिवशी आवश्यक त्या दाखल्याचे वाटपही संबंधित लाभार्थीना करण्यात येणार असून
आरोग्य शिबिराचे आयोजनही आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. या मेळाव्यात
तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहनही उपविभागीय अधिकारी
श्री. तेली यांनी केले आहे.
000000








0 Comments