सिंधुदुर्ग आणि चंद्रपुरमधील फलोत्पादन आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा - राज्यमंत्री दीपक केसरकर


पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

दि. 14 ऑक्टोबर 2015

मुंबई दि 14 : सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये कृषी आणि फलोत्पादनासाठी सकस जमीन आणि पोषक वातावरण आहे. याचा फायदा करुन या जिल्ह्यांमधील कृषी उत्पादन आणि फलोत्पादन वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज दिल्या.

सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर जिल्हयातील मायक्रो प्लॅनिंग अंतर्गत कृषी विकासासंदर्भातील बैठक आज मंत्रालयात वित्त  व नियोजन राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्यासह चंद्रपूर व सिंधुदुर्गचे कृषी उपायुक्त, फळ संशोधन केंद्राचे प्रतिनिधी, तसेच अरुण शर्मा आणि सजन बजाज हे उद्योगपती आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. केसरकर यावेळी म्हणाले की, सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये साधनसंपत्तीचे परिणामकारक नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भात पिकविण्यासाठी आणि फलोत्पादनासाठी हे दोन्ही जिल्हे उत्तम आहेत. त्यामुळे अधिकाधिक भात लागवडीसाठी प्रयत्न करताना या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वंकष विकास करण्याच्या दृष्टीने या दोन जिल्ह्यांसाठी मायक्रो प्लॅनिंग करुन कृषी आराखडा तयार करणे आवश्यक आहे. या दोन्ही जिल्ह्यातील वनसंपत्ती, पर्यटन, मत्स्य उत्पादन, फलोत्पादन इत्यादी
साधनसंपत्ती चांगली आहे. त्यामुळे येथील साधनसंपत्तीवर आधारित उद्योग, रोजगार, कृषी, मत्स्यसंवर्धन, पशुसंवर्धन, प्रक्रिया उद्योग, पर्यटन, वनउपज आधारित उद्योग, महिला बचत गट सक्षमीकरण, कौशल्यवृद्धी आदी कार्यक्रमांतर्गत रोजगार निर्मिती अशा सर्व योजना व कार्यक्रमांची सांगड घालून जिल्ह्यांच्या विकासाचे मॉडेल तयार करण्याचे काम आगामी काही काळात करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी या दोन्ही जिल्ह्याचे मायक्रो प्लॅनिंग करुन त्यापद्धतीने आराखडा राबविण्यात येणे आवश्यक आहे, अशी भूमिका श्री. केसरकर यांनी यावेळी मांडली.

0000000

______




Post a Comment

0 Comments