रब्बी पिकांच्या पेरणीस सुरूवात............. राज्यात सरासरीच्या 61 टक्के पाऊस, 56 टक्के पाणीसाठा

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 14 ऑक्टोबर 2015

राज्यात आजपर्यंत 710 मि.मी. पाऊस झाला असून तो 1159.6 मि.मी. या सरासरीच्या 61.2 टक्के आहे. राज्यातील सर्व जलप्रकल्पांत 56 टक्के एवढा साठा आहे. राज्यातील खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असून काही जिल्ह्यांत रब्बी पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली आहे.


राज्यात सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसानुसार जिल्ह्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे-  धुळे, नंदूरबार, पुणे, सांगली, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया या 12 जिल्ह्यांत 76 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जळगाव, अहमदनगर, सातारा, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या 18 जिल्ह्यांमध्ये 51 ते 75 टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, परभणी या 4 जिल्ह्यांत 26 ते 50 टक्के पाऊस पडला आहे.

राज्यातील 355 तालुक्यांपैकी शून्य तालुक्यात सरासरीच्या तुलनेत 0 ते 25 टक्के, 51 तालुक्यांत 26 ते 50 टक्के, 176 तालुक्यांत 51 ते 75 टक्के, 107 तालुक्यांत 76 ते 100 टक्के आणि 21 तालुक्यांत तर 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात रब्बी पिकांच्या पेरणीस सुरूवातराज्यातील रब्बी पिकांखाली सरासरी क्षेत्र 62 लाख 43 हजार हेक्टर असून 9 ऑक्टोबर अखेर 8 लाख 4 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत 13 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यातील काही भागांत रब्बी हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे सुरू असून नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर व अमरावती विभागात पेरणीस सुरूवात झाली आहे.

सोयाबीन, मूग, उडीद, बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात तर कापसाच्या वेचणीस सुरुवातराज्यात भात पीक निसवणे, दाणे भरणे ते दाणे पक्वतेच्या अवस्थेत आहे.  खरीप ज्वारी पीक दाणे भरणे ते दाणे पक्वतेच्या अवस्थेत, बाजरी पीक दाणे भरणे ते दाणे पक्वतेच्या अवस्थेत तर काही ठिकाणी काढणीस सुरुवात झाली आहे. मका पीक वाढीच्या, फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.  तूर पीक वाढीच्या ते फुलोरा अवस्थेत, उडिद व मुग पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. सोयाबीन पीक पक्वता ते काढणीच्या अवस्थेत आहे.  कापूस पीक बोंडे लागणे ते बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असून काही ठिकाणी राज्यातील सर्व जलप्रकल्पांत 56 टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 77 टक्के साठा होता.

प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा पुढीलप्रमाणे-मराठवाडा - 15 टक्के (42), कोकण - 88 टक्के (93), नागपूर - 69 टक्के (69),  अमरावती- 72 टक्के (74), नाशिक - 60 टक्के (85) आणि पुणे - 61 टक्के (91), इतर धरणे - 73 टक्के (88) असा पाणीसाठा आहे.

          राज्यातील 486 गावे आणि 1108 वाड्यांना आजमितीस 654 टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.  गेल्या काही दिवसात टँकर्सची संख्या घटली आहे.  मागील वर्षी याच सुमारास 49 टँकर्सद्वारे पुरवठा करण्यात येत होता.

रोहयो कामांवर एक लाख मजुरांची उपस्थिती
            राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांवर 3 ऑक्टोबर अखेर एक लाख दोन हजार 729 मजुरांची उपस्थिती होती. तसेच राज्यात 13 हजार 317 कामे सुरू असून चार लाख 22 हजार 639 कामे शेल्फवर आहेत. या कामांची मजूर क्षमता 1323.68 लाख एवढी आहे.

                                                 -----0-----0000

______




Post a Comment

0 Comments