सहकारी व जिल्हा बँकांनी मुद्दलाच्या रक्कमेपेक्षा अधिक व्याज वसुल करु नये - दादाजी भुसे

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-दि. 14 ऑक्टोबर 2015


मुंबई, दि. 14 : महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 चे कलम 44-अ प्रमाणे कर्जदार सभासदाकडून सहकारी संस्था, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्याकडून मुद्दलापेक्षा जास्त रक्कमेचे व्याज वसुल केले जाते असे निदर्शनास आले आहे. सदरील कायदयानुसार सहकारी व जिल्हा बँकांनी मुद्दलाच्या रक्कमेपेक्षा अधिक व्याज वसुल करु नये, असे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.


श्री. भुसे यांनी मंत्रालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी तेबोलत होते. सदरील सहकारी बँका कर्जाची वसुली करताना सभासदांकडून भरलेली रक्कम व्याजापोटी जमा करतात. त्यामुळे मुद्दल तसेच राहते व व्याजाचा बोजा वाढतच जातो. त्यामुळे शेतकरी वर्गावर अन्याय होतो. ज्या शेतकरी बांधवानी किंवा सभासदांनी मुद्दल व तेवढीच रक्कम व्याजापोटी भरलेली असेल किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम संबंधित पतसंस्था व बँकेत भरली असेल अशा सभासदांना कर्जमुक्त समजण्यात येईल.

या अधिनियमानुसार सहकारी बँकाना मुद्दलापेक्षा अधिक व्याज घेण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. या कायदयाचे उल्लंघन करणार्‍या सहकारी संस्था व बँका यांना प्रथम दर्शनी नोटिस बजावण्यात येईल असे ही त्यांनी सांगितले.  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था हे वेळोवेळी सदर बाबीची तपासणी करतील आणि ज्या सहकारी बँका, सहकारी संस्था वरील नियमाचे पालन करत नाही असे दिसून आले तर अशा संस्थाविरुध्द तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.श्री. भुसे यांनी मंत्रालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते सांगितले.

00000
0000

______




Post a Comment

0 Comments