| ||
Journalism in India was once a profession. It has now become a trade.
It has no more moral function than the manufacture of soap. - Dr. Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे केवळ घटनेचे शिल्पकार व दलितांचे नेते म्हणून पाहिजे जाते. मात्र ते एक संपादक, पत्रकार होते. ब्राम्हणेत्तरांच्या वृत्तपत्रांनी जे सामाजिक सुधारणेसाठी योगदान दिले. त्याची प्रेरणा घेऊन वृत्तपत्र काढण्याची कल्पना पुढे आली. वृत्तपत्र हे आधुनिक युगाचे प्रगतीचे, लोकशिक्षणाचे चांगले माध्यम म्हणून अस्पृश्यांच्या हक्काची मागणी मांडता येईल; असे लक्षात आल्यावर डॉ. आंबेडकरांनी 31 जानेवारी, 1920 रोजी ‘मुकनायक’ हे पाक्षिक सुरू केले. मुकनायकामध्ये डॉ. आंबेडकरांनी एकूण 14 लेख लिहिले. त्यानंतर ते पुढील उच्चशिक्षणासाठी लंडनला गेले. आपल्या पहिल्या अंकात त्यांनी वृत्तपत्र सुरु करण्यामागील भूमिका मांडली. ते म्हणतात, ‘आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भुमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे तर, केव्हा-केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रांना आमचा ऐवढा इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा फटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारुंना जाणून-बुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा; जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व प्रवाशांबरोबर त्यालाही आधी किंवा नंतर जलसमाधी ही घ्यावीच लागते. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहित साधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये. सर्व जातीच्या हिताची भूमिका वृत्तपत्रांनी घेतली तरच ते सर्वांच्या हिताचे ठरते. आत्मकेंद्रित आणि स्वार्थाने प्रेरित वृत्तपत्रे ही समाजासाठी नुकसानकारक ठरणारी असतात़.’
मूकनायकाच्या पहिल्या अंकाच्या शीर्षभागी बाबासाहेबांनी संतकवी तुकारामाच्या ‘काय करु आता धरुनिया भीड ! नि:शक हे तोंड वाजविले !! नव्हे जगी कोणी मुकियांचा जाणे! सार्थक लाजून नव्हे ही !!’ या ओळी उद्घृत केल्या होत्या. पत्राच्या शीर्षभागी वचने वा पद्यपंक्ती उद्घृत करण्याची त्याकाळी प्रथा होती. तुकारामाच्या अर्थपूर्ण ओळीतून बाबासाहेबानी आपल्या ध्येयाचा उच्चार केला होता असे म्हणावे लागेल. बाबासाहेबांनी या पत्रात एकूण चौदा अग्रलेख व काही स्फुटे लिहिली यात विविध प्रश्नाचा अंतर्भाव दिसून येतो सामाजिक प्रश्नांना मात्र त्यात अग्रत्व लाभले होते ‘हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे’ (मूकनायक जानेवारी 1920) हा विचार त्यांनी पुन: पुन: प्रतिपादन केला. अस्पृश्यांना राजकीय हक्कांची घोषणा करताच त्याविरुद्ध कसा कांगावा केला जातो याचे वस्तूनिष्ट चित्रण बाबासाहेबांनी एका लेखात केले. ते म्हणतात, ‘जातीभेद व जाती मत्सर यांनी ग्रस्त झालेल्या या देशात खरे स्वराज्य नांदण्यास या बहिष्कृत वर्गास प्रतिनिधीतर्फे राजकीय सत्तेचा पुरेसा भाग मिळावा या मागणीस त्यांच्या वरिष्ठांनी कसून केलेल्या विरोधात खोडसाळपणाबद्दल बहिष्कृत वर्गाने तक्रार केली आहे. एवंच राजकीय सत्ता मिळवून तिच्या जोरावर सामाजिक विषमतेचे दडपण कायम करु पाहण्याचा कावा बहिष्कृत समाजाने ओळखला आहे.’ (मूकनायक जाने. 1920) ‘मुकनायक’ जवळपास सहा महिने व्यवस्थित चालले. पुढे अंतर्गत वादामुळे ते 1923 साली बंद पडले. अल्पकाळात ही ‘मुकनायक’ ने दलित समाजात एक चळवळ उभी केली. आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करुन दिली. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातही आपल्या अस्तित्वाची निकड असल्याची जाणीव अस्पृश्यांमध्ये निर्माण करण्याबरोबर ‘मुकनायक’ ने अस्पृश्यांची अस्मिता जागविण्याचेही कार्य केले. सनातन्यांच्या आव्हानाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी चळवळ अधिक सक्षम करणे आंबेडकरांना गरजेचे वाटले व त्यांनी 1924 मध्ये ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. या सभेद्वारे त्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले. याच काळात त्यांनी बहिष्कृत परिषद घेतली. चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा सत्याग्रह ही केला. अस्पृश्यांची चळवळ भक्कम करण्यासाठी आपले वृत्तपत्र असल्याशिवाय पर्याय नाही असे त्यांना पुन्हा वाटू लागले व 3 एप्रिल 1927 रोजी त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ वृत्तपत्र सुरु केले. ‘बहिष्कृत भारता’ मध्ये आंबेडकरांनी जवळपास 33 अग्रलेख लिहिले. अन्य प्रकारचे लेखनही केले. या वृत्तपत्रांची संपादनासह सर्व जबाबदारी त्यांनी एकट्याने सांभाळली. महार वतन, महाडचा धर्म संगर, अस्पृष्यता निवारण, धर्मांतर, जातिभेद, शिक्षण, स्वातंत्र्य आदी विषयांवर लेख, अग्रलेख लिहून सखोल चर्चा केल्याचे आढळून येते. महारांमध्ये निष्क्रियता निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारी वतनदारी पद्धत बंद व्हावी म्हणून आंबेडकरांनी प्रयत्न केला. वतनदारी नष्ट झाली तरच शोषण थांबेल; असा त्यांचा ठाम विश्वास होता. बहिष्कृत भारतात त्यांनी महार वतनावरील लिहिलेले चार लेख बाबासाहेबांची संशोधनपरता, ठाम विचार, मानवी मूल्यांची आच आणि कर्तव्यकठोरता यांचे दर्शन घडवितात. धर्म, धर्मांतर आणि धर्मग्रंथ या संबंधीचे डॉ. बाबासाहेबांचे चिंतन तर सांप्रदायिकतेला छेद देणारे आहे. धर्म आणि समाज या दोन्ही संस्थांचे विलगीकरण होणे त्यांना अपरिहार्य वाटते. धर्मांतर हे राष्ट्रनंतर नव्हे की वस्त्रांतर, अशी त्यांची स्वच्छ भूमिका होती. प्रारंभी हिंदुधर्मत्यागाचा निश्चय झाल्यानंतर नेमका कोणता धर्म स्वीकारावा, या संबंधीची अनिश्चितता त्यांच्या अनेक लेखांत उमटली आहे; पण पुढे धर्मच स्वीकारायचा, तर तो या देशातील संस्कृतीला उपकारक ठरणारा हवा ही भूमिका त्यांनी व्यक्त केली. धर्मांतरसंबंधीची मते आणि मतांतरेही त्यांनी काही लेखांत विशद केली आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पत्रातून विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत. अगदी बालविवाहापासून ते सहशिक्षण, सहभोजन आणि पुढे शेती, शेतकरी, खोतीशाहीपर्यंत. सत्याग्रहाचाही सैद्धन्तिक विचार त्यांनी मांडला आहे; पण या सर्व लेखनाचे सूत्र प्राधान्याने सामाजिक-सांस्कृतिक आणि नवसमाजनिर्मिती हेच आहे. म. गांधी, पं.नेहरू यापासून तो हिंदू महासभा-सत्यशोधक समाज यासंदर्भातही त्यांनी परखड विचार मांडले आहेत. या सर्व लेखानातून प्रचंड अभ्यास, परखडपणा, तर्कशुद्धता, चिकित्सकता, यांचे प्रत्यंतर येते. तेजस्वी विचारसरणी आणि धारदार भाषा, आणि दंभावर कठोर प्रहार करणारे बाबासाहेब अनेकदा उपरोधगर्भ भाषेचाही वापर करतात. अस्पृश्यता नष्ट झाल्याशिवाय समाजमने एकत्रित नांदू शकणार नाही. यासाठी सामूहिक भोजन व आंतरजातिय विवाह या मार्गांचा अवलंब करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 13 ऑक्टोबर, 1935 रोजी आंबेडकरांनी ‘येवला’ येथे धर्मांतराची घोषणा केली. सनातनी वृत्तपत्रांनी त्यांच्यावर कडक टीका केली. ज्या धर्मात राहून हक्क मिळत नाही, तो धर्मच त्यागणे अधिक चांगले; असे आंबेडकरांनी जाहीर केले. या संदर्भांत आपली भूमिका बहिष्कृत भारतच्या अग्रलेखातून स्पष्ट केली. याच काळात आंबेडकरांनी हिंदुसभा लुळी का पडली, हिंदू महासभा विरुद्ध हिंदू मंडळ, खुदा देखता है, शारीरिक उन्नतीला धर्मांची हरकत, अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया, आजकालचे प्रश्न आदी लेख लिहून समाज जागृती केली. ‘बहिष्कृत भारत’ तीन वर्ष व्यवस्थित निघाल्यानंतर आर्थिक अडचण भासू लागली. शेवटी 15 नोव्हेंबर, 1929 रोजी हे वृत्तपत्र बंद पडले. डॉ. आंबेडकरांना वृत्तपत्राची शक्ती माहीत होती. वृत्तपत्र हाताशी नसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. चळवळ दूरवर पोहोचविण्यासाठी वृत्तपत्र हवे; असे त्यांना वाटू लागले व पुन्हा मोठ्या जिद्दीने 24 नोव्हेंबर 1930 रोजी ‘जनता’ नावाचे वृत्तपत्र सुरु केले. प्रारंभी ते पाक्षिकरुपात निघायचे नंतर त्याचे रुपांतर साप्तहिकात झाले. त्यांना परदेशात जायचे असल्याने, ‘जनता’ ची जबाबदारी देवराव नाईक यांच्यावर सोपावली. परदेशात असले तरी त्यांनी ‘जनता’ साठी लेख पाठविले. वेळावेळी मदतही केली. ‘जनता’ कसे असावे, काय छापले, याचे वेळोवळी मार्गदर्शन डॉ. आंबेडकर यांनी केले. म्हणूनच हे साप्ताहिक 1955 पर्यंत जवळपास 25 वर्षे चालले. ‘जनता’ च्या प्रदीर्घ प्रवासात दलित जनतेची मोठी साथ लाभली होती. डॉ. आंबेडकरांचा लेख ‘जनता’ मध्ये आहे. म्हटल्यावर वाचकांच्या उड्या पडायच्या, एवढी लोकप्रियता लाभली होती. दलितांना बंडखोरीचे तत्वज्ञान आणि संघर्ष वृत्ती ‘जनता’ नेच प्रदान केली. म्हणूनच ‘जनता’ वृत्तपत्राचे स्थान मोठे आहे. 1956 मध्ये डॉ. आंबेडकर भारतात आल्यावर, ‘जनता’ पत्राचे त्यांनी नामांतर करुन त्याचे रुपातंर ‘प्रबद्ध भारत’ असे केले. पुढे ते ‘प्रबुद्ध भारता’चे फार काळ काम पाहू शकले नाही. त्यांच्या महानिर्वाणानंतर संपादकीय मंडळ नियुक्त झाल्यानंतर पुन्हा ‘प्रबद्ध भारता’ची दमदार वाटचाल सुरु झाली. यशवंतराव आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात यांनी प्रबद्ध भारताची जबाबदारी स्वीकारली. बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून अत्यंत आव्हानास्पद आणि अवघड असे कार्य केले आहे. त्यांच्या वृत्तपत्रांनी केवळ अस्पृश्यांना व दलितांना जागविण्याचेच कार्य केले नाही, तर स्पृश्यांनाही आपल्या समाजद्रोही भूमिका तपासून पाहण्याचे आवाहन वारंवार केले. या आवाहनाच्या मागे समग्र भारतीय समाजाच्या एकसंधतेची व एकात्मतेची, समतेची व स्वातंत्र्याची मागणी होती. वृत्तपत्रे ही नैतिक पायावर उभी असली पाहिजेत, अशी त्यांची धारणा होती. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देऊन आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रींच्या आधारे डॉ. आंबेडकरांनी विविध वृत्तपत्रे काढून समाजाभिमुख पत्रकारिता केली. अंधारात खितपत पडलेल्या दलित बांधवांना एक स्फूर्ती, ऊर्जा, देण्याचे काम या वृत्तपत्राच्या माध्यमातून केले. म्हणूनच अशा थोर संपादकाला त्यांच्या महापरिनिर्वाणदिनी भावपूर्ण आदरांजली ! डॉ. सं. शि. खराट ठाणे. | ||

0 Comments