सोलापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सहा संचालक निवडण्यासाठी सोमवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतदानावेळी अनुचित प्रकार करणार्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक बिभीषण लावंड यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा संचालक पदासाठी निवडणूक लागली आहे. यासाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ यादरम्यान जिल्हाभरातील मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ८ प्रमाणे ८८ कर्मचारी नियुक्त केले आहेत. याशिवाय उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यासाठी एक, पंढरपूर, माळशिरस व मोहोळसाठी एक, माढा, करमाळा व बाश्रीसाठी एक व सांगोला, मंगळवेढय़ासाठी एक असे चार झोनल अधिकारी नियंत्रणासाठी आहेत. त्यांच्यावर तीन सहायक निवडणूक अधिकारी काम पाहत असल्याचे लावंड यांनी सांगितले. निवडणूक मतदान केंद्रांवर व परिसरात अनुचित प्रकार घडल्यास फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही लावंड यांनी सांगितले. मतदानासाठी निवडणूक आयोगाने सांगितल्यापैकीच पुरावे असतील तरच मतदान करता येईल, असेही ते म्हणाले.
0 Comments